माईंडफुलनेस – माईंड इट

डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी. "मी काहीही करताना लक्ष केंद्रीत करू शकत नाही" जीवन म्हणाले. साधारणतः ५ वर्षापूर्वीची गोष्ट, हॉस्पिटलमधील माझ्या केबीनच्या काचेच्या खिडकीवर पाऊस सौम्यपणे थेंबा-थेंबाने पडत होता. बाहेर मळभ दाटून आलेले होते. माझ्या समोरील खुर्चीवर नवीन रुग्ण जीवन येऊन बसले. ते अतिशय शांत व चिंतातूर दिसत होते. त्यांच्या थकलेल्या आणि भटकणाऱ्या डोळ्यांमधून त्यांच्या आतील अशांतता दिसून येत होती. जीवन 30 वर्षाचे होते. त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय चालू केला होता. "मी काहीही करताना लक्ष केंद्रित करू शकत नाही. काम असो, संवाद असो किंवा इतकेच काय माझ्या आवडीच्या गोष्टी किंवा छंद असो कशातच मन लागत नाही. सर्व काही खूप अस्थिर वाटते, वरवरचे वाटते." त्यांच्या आवाजात तणाव वाटत होता. मी मनोविकारतज्ञ म्हणून काम करत असताना जीवनसारखे कित्येक पेशंट माझ्याकडे आलेले आहेत, मी पाहिलेले आहेत, जे त्यांच्या जीवनात एकाग्रतेच्या अभावाच्या समस्यामुळे त्रस्त आहेत. सध्याच्या काळामध्ये तर ते खूप प्रामुख्याने दिसून येत...