माईंडफुलनेस – माईंड इट
डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ.
माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी.
"मी काहीही करताना लक्ष केंद्रीत करू शकत नाही" जीवन म्हणाले.
साधारणतः ५ वर्षापूर्वीची गोष्ट, हॉस्पिटलमधील माझ्या केबीनच्या काचेच्या खिडकीवर पाऊस सौम्यपणे थेंबा-थेंबाने पडत होता. बाहेर मळभ दाटून आलेले होते. माझ्या समोरील खुर्चीवर नवीन रुग्ण जीवन येऊन बसले. ते अतिशय शांत व चिंतातूर दिसत होते. त्यांच्या थकलेल्या आणि भटकणाऱ्या डोळ्यांमधून त्यांच्या आतील अशांतता दिसून येत होती. जीवन 30 वर्षाचे होते. त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय चालू केला होता. "मी काहीही करताना लक्ष केंद्रित करू शकत नाही. काम असो, संवाद असो किंवा इतकेच काय माझ्या आवडीच्या गोष्टी किंवा छंद असो कशातच मन लागत नाही. सर्व काही खूप अस्थिर वाटते, वरवरचे वाटते." त्यांच्या आवाजात तणाव वाटत होता. मी मनोविकारतज्ञ म्हणून काम करत असताना जीवनसारखे कित्येक पेशंट माझ्याकडे आलेले आहेत, मी पाहिलेले आहेत, जे त्यांच्या जीवनात एकाग्रतेच्या अभावाच्या समस्यामुळे त्रस्त आहेत. सध्याच्या काळामध्ये तर ते खूप प्रामुख्याने दिसून येते कारण सध्याचा काळ वेगाचा आहे, तीव्र स्पर्धेचा व धकाधकीचा व सोशल मिडियाच्या भडिमाराचा आहे. मी त्यांची माहिती व हिस्टरी घेतली. त्यांनंतर माझ्या लक्षात आले की त्यांना नैराश्य, काळजी किंवा इतर कुठल्याही मानसिक आजाराची लक्षणे नव्हती व त्यामुळे गोळ्यांचीही गरज नव्हती.
"जीवन" मी सुरुवात केली, माझा स्वर सौम्य आणि निश्चीत होता. " तुम्ही ज्या परिस्थतीतून जात आहात, जे अनुभवत आहात ही समस्या असामान्य नाहिये. बऱ्याच लोकांना या अनुभवाचा सामना करावा लागतो. बरेचजण या परिस्थितीमधून जातात. आणि हा कुठलाही मानसिक आजार नसल्यामुळे यासाठी तुम्हाला औषधोपचार करायची गरज नाही. एक गोष्ट आहे जी तुम्हाला यामध्ये मदत करु शकते आणि प्रभावशाली ठरु शकते, ती म्हणजे माईंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणे, सध्याच्या क्षणात पुर्णपणे सक्रिय राहणे, सध्याच्या क्षणाचा पूर्णपणे अनुभव घेणे. आपल्या सर्व संवेदना अनुभवने, सर्व चेतना अनुभवने. हे करताना सध्याच्या क्षणाचे काळाचे सूक्ष्मपणे निरिक्षण केले जाते. त्याच्यावर भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा किंवा त्यासंबधीत विचाराचा परिणाम होऊ दिला जात नाही. फक्त सध्या येणाऱ्या चेतानांवर, विचारांवर, भावनांवर लक्ष केंद्रित केले केले जाते, त्याचे निरिक्षण केले जाते.”
जीवनला उत्सुकता वाटली, त्याने थोडेसे पुढे झुकत विचारले "माईंडफुलनेस का महत्वाचे आहे, त्याने काय होईल?" “माईंडफुलनेस खूप महत्वाचे आहे, त्याने खूप फायदा होतो” मी स्पष्ट केले. "माईंडफुलनेस ताण कमी करते, कामगिरी सुधारते आणि त्यामुळे तुमची सद्यस्थितीबद्धलची जागरुकता आणि त्यावरचे लक्ष वाढवते. माइंडफुल असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवू शकता. भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी व मानसिक किंवा भावनिक त्रास करून घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता, परिस्थिती स्विकारू शकता, योग्य ती पावले उचलू शकता. तुम्ही हाती घेतलेल्या कामावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकता, ते पूर्ण करु शकता." मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला. जीवनलाही हे समजत होते. त्यांना त्याचे फायदे लक्षात आले असावेत, परंतु प्रत्यक्ष पावले कशी टाकावीत याची त्यांना खात्री नसावी, म्हणून त्यांनी विचारले, “मग मी त्यासाठी नेमके काय करायला हवे?"
"हा खूप चांगला प्रश्न आहे” मी म्हणालो "माईंडफुलनेसचा अभ्यास किंवा सराव दिवसभरात साध्या पद्धतीने करता येऊ शकतो. उदारणार्थ तुम्ही रोज सकाळी काही मिनिटांसाठी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करू शकता. ही एक मुलभूत पद्धत आहे जी तुम्हाला माईंडफुलनेसची अनुभूती देते. आणि तुमच्या विचारांना केंद्रित करायला मदत करते. त्यासोबतच दिवसभरात अनेकदा थांबा आणि काही खोल श्वास घ्या. फक्त हवा आपल्या शरीरात प्रवेश करण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करा. त्या सोबतच खाणे, चालणे, किंवा चर्चा करताना माईंडफुल राहण्याचा प्रयत्न करा. संवेदना, चवी, आवाजावर लक्ष द्या आणि संपूर्णपणे अनुभवात गुंतून जा. तुमच्या मनाला भटकु देऊ नका. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करुन त्याक्षणी फक्त ती गोष्ट अनुभवन्याचा प्रयत्न करा. उदारणार्थ जेवण करताना पूर्ण लक्ष जेवणाकडे दया. आपल्या ताटामध्ये काय काय पदार्थ आहेत ते पहा. ते कसे दिसतात, ते पहा. त्याबद्धल विचार करा. त्यानंतर त्याचा सुगंध अनुभवा. प्रत्येक पदार्थाचा एक वेगळा सुगंध असतो तो अनुभवा. प्रत्येक पदार्थाला स्पर्श करून पहा. काही मऊ असतील, काही टणक असतील, त्यांचा आकार प्रकार स्पर्श करून अनुभवा. एखादा पदार्थ उदा. पापड तोडताना येणारा आवाज अनुभवा. प्रत्येक पदार्थची चव अनुभवा. एका वेळी एकच पदार्थ खा. तो जीभेवर ठेवल्यावर त्याची चव कशी असते, जीभेला त्याचा स्पर्श कसा जाणवतो. तोच चावल्यावर मध्ये किंवा पूर्ण चावून झाल्यावर त्याचा स्पर्श जिभेला कसा जाणवतो, त्याची चव कशी बदलते ते अनुभवा. हे सर्व करताना लक्ष पूर्ण जेवणाकडे असू द्या. पूर्वी जेवताना रांघोळी काढली जायची, ठराविक पद्धतीने पदार्थ वाढले जायचे, अगरबत्ती लावली जायची, माथ्यावरती टिळा लावला जायचा, जेवणापूर्वी वदनी कवळ घेता प्रार्थना म्हटली जायची; ते सर्व पंचेन्द्रीयाने हे सर्व अनुभवण्यासाठी. जेवताना गप्पा मारणे, टी.व्ही पाहणे, वाचणे, मोबाइल वापरणे इत्यादी गोष्टी टाळा. यामुळे भूखही क्षमते आणी जेवण्याचे समाधानही मिळते. पचन सुधारते आणि अन्नाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. अशाचप्रकारे तुम्ही बोलताना, चालताना किंवा काहीही गोष्ट करताना करु शकता. पूर्ण लक्ष फक्त त्यावर केंद्रीत करून ती करू शकता, अनुभवु शकता. चालताना थोडे अंतर असो किंवा लांबचा फेरफटका असो, चालण्याच्या अनुभवाकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्या हात-पायांच्या हालचाली, तुमच्या पायांना जमिनीचा किंवा चपलांचा स्पर्श, आणि तुमच्या भोवतीचे आवाज, दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा कोणीतरी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा सक्रियपणे ऐका. पुढचे काय बोलायचे ते विचार करण्याऐवजी, त्यांच्या आवाजाचा स्वर, त्यांच्या भावना, त्यांचे हावभाव याकडे लक्ष द्या. संवादात पूर्णपणे सहभागी व्हा. तुम्ही दररोज पाहणाऱ्या कोणत्याही वस्तूवर काही मिनिटे सजगपणे लक्ष केंद्रित करा. ती वस्तू एखादी वनस्पती, भिंतीवरील चित्र किंवा कॉफीचा कप असू शकते. वस्तूच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करा, आधी कधीही न पाहिलेल्या तपशिलांकडे लक्ष द्या. तुमचा दैनंदिन प्रवास माइंडफुलनेसच्या अभ्यासाची संधी म्हणून वापरा. तुम्ही ड्राइव्हिंग करत असल्यास, विचारांमध्ये किंवा नैराश्यात हरवून जाण्याऐवजी ड्राइव्हिंगच्या क्रियेकडे, रस्त्याकडे आणि तुमच्या परिसराकडे लक्ष द्या. ऑफिस मधील किंवा घरातील कामे मन लावून करा. भांडी धुणे किंवा व्हॅक्यूम क्लिनर चालवणे सारख्या घरगुती कामांमध्ये पूर्णपणे सहभागी व्हा. प्रक्रियेतील संवेदना आणि हालचालींकडे लक्ष द्या. प्रत्येक कामाला माइंडफुलनेसचा अभ्यास म्हणून समजा. दिवसभरात, थोडे विराम घ्या आणि फक्त थांबून तुमच्या शरीराची भावना जाणून घ्या. अस्वस्थता, तणाव किंवा शिथिलता यात काहीही बदल करण्याचा प्रयत्न न करता त्यांची संवेदना लक्षात घ्या. उपकरणांवर घालवलेल्या वेळेचा अधिक जाणीवपूर्वक वापर करा. विचारशून्यपणे ब्राउझिंग करण्याऐवजी ईमेल्स तपासणे किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करणे इत्यादी गोष्टी पूर्ण लक्ष देऊन परंतु निश्चित कालावधीसाठीच करा. प्रत्येक दिवसाच्या शेवटी काही मिनिटे चिंतन करा. तुम्ही काय केले, तुम्हाला कसे वाटले आणि दिवसातील कोणते क्षण महत्वाचे वाटले हे स्वतःला विचारा. हे तुम्हाला तुमच्या कृती आणि प्रतिक्रियांची अधिक चांगली समज देऊ शकते आणि पुढच्या दिवसासाठी तयारी करण्यास मदत करते."
हे सर्व ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणारी चिंता पाहून पुढे बोललो. “अर्थात हे तेवढे सोपे नाही. यात बराच वेळ जाईल. पण जे कराल त्याचा फायदा खूप मोठा होऊ शकतो. तुम्ही माईंडफुलनेसचा नियमित अभ्यास व वापर केल्यास तुम्हाला बदल लक्षात येतील. तुमचा तणाव कमी होऊ शकतो, आणि तुमची एकाग्रता आणि लक्ष वाढू शकते. आणी हे तुम्ही नियमितपणे करत राहिल्यास कालांतराने मेंदूतील पेशींमध्ये कायमस्वरुपी बदल होऊन तुम्हाला या गोष्टी सहजपणे जमायला लागतील. ज्यामुळे आपोआपच तुमच्यामध्ये तणावविरोधी प्रतिकारक शक्ती येऊ शकते आणि तुम्ही लक्षक्षील बनू शकता.”
जीवनच्या डोळ्यात आशा आणि दृढ निश्चयाचे संमिश्र भाव दिसून येत होते. "आणि हे बदल.. खरोखरच माझ्या जीवनात अधिक यश मिळविण्यास मदत करु शकतात?" जीवनने विचारले. "नक्कीच!" मी त्यांना आश्वासन दिले. तुमच्या दैनंदिन दिनक्रमात माईंडफुलनेसचा समावेश करून तुम्ही फक्त तुमचे वैयक्तीक जीवनच नाही तर व्यवसायिक जीवनसुद्धा सुधारु शकता. हे तुमची समजण्याची आणि सहानुभूतीची क्षमता वाढवते, समस्या सोडवण्याच्या कौशल्यात सुधारणा करते, आणि तुमची सर्जनशीलता सुद्धा वाढवू शकते."
आमचे समुपदेशनाचे सत्र संपण्याच्या वेळी बाहेरील पाऊस कमी झाला होता आणि मळभही कमी झाले होते आणि ढगांमधून सौम्य लख्ख प्रकाश खाली येत होता, ज्यामुळे माझी केबिनही लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाली होती. जीवन उभा राहिला, आता त्याच्या ओठांवर हास्य होते. त्याच्या उभ्या राहण्यात तयारीची भावना स्पष्ट दिसत होती. "धन्यवाद डॉक्टर”, तो म्हणाला. त्याचा आवाज आता स्थिर व अधिक आत्मविश्वासी झाला होता. "मला वाटते की माझ्या समस्यांवर मात करण्यासाठी मला एक नवीन साधन मिळाले आहे” तो बाहेर पडत असताना, मी एक परिचित आत्मसंतुष्टी आणि समाधानाची लाट अनुभवली, आणि पुन्हा एक वेळा मला माइंडफुलनेसच्या आपल्या जीवनावर होणाऱ्या गहन काही परिणामांची आठवण झाली. जीवनचा प्रवास आता चालू झाला होता. माईंडफुलनेसच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली तो अधिक समृद्ध आणि केंद्रित जीवनाच्या दिशेने जाणार याची मला खात्री होती.
Comments