अल्झायमर्स आजार(स्मृतीभ्रंश)
अल्झायमर्स आजार(स्मृतीभ्रंश)
*जागतिक अल्झायमर्स (स्मृतीभ्रंश) दिवस (२१ सप्टेंबर)* च्या निमित्ताने *डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी* यांनी लिहिलेला लेख ... आपणही वाचा, दुसर्यांनाही पाठवा.*जागतिक अल्झायमर्स (स्मृतीभ्रंश) दिवस (२१ सप्टेंबर)*
सद्यस्थितीत पूर्ण जगात ४६.८ दश लक्ष रुग्ण अल्झायमर्स आजाराने पिडीत आहेत. त्यापैकी ३.७ दश लक्ष रुग्ण हे भारतात आहेत. २०३० मध्ये हि संख्या दुप्पट होणार असे एका अहवालात म्हटले आहे.मृत्युच्या कारणांमध्ये याचा सहावा क्रमांक लागतो.याचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराबद्दल समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळेच २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर्स दिवस म्हणुन साजरा केला जातो
*अल्झायमर्स आजार म्हणजे नेमके काय?*
अल्झायमर्स आजार हा असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीची मानसिक क्षमता विशेषतः स्मरणशक्ती दुर्बल होत जाते. रुग्ण व्यक्ती पूर्वी जी कामे करू शकत असे ती कामे करणे अवघड जाते. नेमका शब्द आठवताना किंवा इतर गोष्टी आठवताना समस्या जाणवतात.
*अल्झायमर्स आजार कशामुळे होतो ?*
मेंदूतील काही विशिष्ट्य पेशीमध्ये अमिलॉइड प्लाक व टाऊ प्रोटिन्स निर्माण झाल्यामुळे काम करण्याचे थांबवतात व मरतात त्यामुळे मेंदू मध्ये हा आजार उद्भवतो. हे बदल सुरुवातीला मुख्यतः हिपोकॅम्पस या भागामध्ये जो स्मरणशक्तीही निगडित आहे होतो. नंतर मात्र मेंदू मधील इतर भाग जे भाषा व वैचारिक कार्याशी निगडित आहे अशा भागामध्ये बदल होतात. हा आजार अनुवंवशीकपणे होतो. परंतु सध्याची बदलती जीवनशैली व मुख्यतः मधुमेह, उच्च रक्तदाब व पक्षाघात या आजाराशी हे निगडित आहे. हा आजार शक्यतो वयाच्या साठ वर्षानंतर नंतर होतो. स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.
*अल्झायमर्स आजाराची लक्षणे काय असतात?*
सौम्य प्रकारात किंवा सुरुवातीला विस्मृती, घराचा पत्ता विसरणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, एकच प्रश्न सतत विचारणे, एखाद्या गोष्टीसाठी जास्त वेळ घेणे अशी लक्षणे चालू होतात.
तर मध्यम प्रकारात नवीन गोष्टी शिकू शकत नाहीत, नवीन गोष्टी समजू शकत नाही. अवघड गोष्टी करू शकत नाही. घरातील लोकांची ओळखीच्या लोकांची नावे विसरतात. टॉयलेट, घर इत्यादी गोष्टी कुठे आहेत त्या लक्षात येत नाहीत. दररोजच्या गोष्टी उदाहरणार्थ अंघोळ कशी करावी, जेवण कसे करावे, कपडे कसे घालवीत हे विसरून जातात. बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीत. त्यांना भ्रम व भास होऊ शकतात. तसेच व्यक्तीमत्वात व स्वभावात बदल होतात.
तीव्र प्रकारामध्ये रुग्ण पूर्णपणे दुसर्यांवर अवलंबून असतात. स्वतःच्या नातेवाईकालाही विसरून जातात.लघवी संडासचे भान राहत नाही.स्थळकाळाचे भान जाते.
*कसा ओळखाल अल्झायमर्स आजार (स्मृतिभ्रंश)*
1 आपल्या वस्तू कुठेतरी ठेऊन विसरून जाणे.
2 अलीकडे घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे.
3 काही सांगितलेल्या सूचना किंवा कोणी भेटून गेलेले लक्षात न राहणे.
4 चहा / नाष्टा / जेवण केलेले लक्षात न राहणे.
5 सतत त्याच त्याच गोष्टीविषयी बोलणे.
6 बाहेर गेल्यावर परत येण्याचा रस्ता न सापडणे.
7 जवळच्या नातेवाईकांना न ओळखणे. घरातील व्यक्तींना न ओळखणे.
8 बटन लावणे, कपडे घालणे, जेवणे या गोष्टी व्यवस्थित न करता येणे.
9 संडास / लघवी यांच्यावर नियंत्रण न राहणे.
*अल्झायमर्स आजारा मध्ये काय उपचार असतात?*
अल्झायमर्स आजारासाठी नवीन औषध उपलब्ध झालेली आहेत. डोनेपेझील, मेमनटीन, रीवास्टिग्माईंन इत्यादी औषधे लक्षणांमध्ये थोडीफार सुधारणा घडवून आणतात. तसेच या आजाराची प्रगती होण्याची गती रोखतात. भ्रम, भास, औदासित्य अशा विविध तक्रारीवर चांगल्या प्रकारे व योग्य औषधोपचार करता येतात.
सर्वात महत्वाचे आहे ते रुग्णाची काळजी घेण्यार्या व्यक्तीचे समुपदेशन व रुग्णाची योग्य काळजी घेण्यास शिकवणे.
*रुग्णाची काळजी कशी घेतली गेली पाहिजे?*
1 झोपणे,जेवणे,किंवा शौच इत्यादीसाठी रोज ठराविक वेळेची सवय लावा.
2 घराचा रस्ता दाखवण्यासाठी विशेषतः बेडरूम आणि बाथरूमच्या खुणा करून ठेवा.
3 रुग्ण हरवणे किंवा दिशाभूल होणे टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित जागेवर ठेवा.खिशामध्ये नाव, घराचा पत्ता व संपर्क क्रमांक असलेले ओळख पत्र ठेवा.
4 त्यांना दरवेळी नावासकट हाक मारा.
5 त्यांच्याशी कधीही वाद घालू नका.तुम्ही सांगितलेल्या गोष्टीना उत्तर देण्यासाठी किंवा काम करण्यासाठी रुग्णाला पुरेसा वेळ द्या. आवश्यक असल्यास माहिती किंवा प्रश्न पुन्हा सांगा.
6 मेंदूचा व्यायाम होतील असे खेळ उदा. पत्ते ओळखणे, जुने अल्बम मधून प्रसंग व नातेवाईक ओळखणे इत्यादी खेळ शिकवा व खेळा.
7 खोलीमध्ये मंद प्रकाशाचा दिवा लावा.दिवसा बाहेर उन्हात जाण्याचा आग्रह धरा.रूम मध्ये कॅलेंडर व घड्याळ ठेवा.त्यांना रोज वेळ व तारीख सांगत रहा.
8 रुग्ण देखील एक माणूस आहे ज्याला आजारी असताना काळजी व देखरेखीची गरज आहे.शेवटच्या टप्प्यात लहान मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेणे गरजेचे असते.
*रुग्णांची काळजी घेणाऱ्याने स्वतःची काळजी घेणेही महत्वाचे आहे.काळजी घेणाऱ्या व्यक्ती खूप निराश होऊ शकतात. आणि स्वताच्या आरोग्याची हेळसांड केल्याने आजारी पडू शकतात.त्यामुळे काळजी घेण्याच्या कामात अधेमध्ये विश्रांती आवश्यक असते.घरातील इतरांची मदत घ्यायला हवी. राग किंवा अपराधी भावना असल्यास स्वतःला क्षमा केली पाहिजे.*
*अल्झायमर्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?*
त्यासाठी मेंदूला तल्लख ठेवणे,
मेंदूचे व्यायाम करणे खूप महत्वाचे असते.
वाढत्या टेक्नोलॉजिचा शक्यतो कमी वापर करून मेंदूचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
त्यासाठी शब्द कोडी सोडवणे, सुडोकु, बुद्धिबळ हे चांगले खेळ आहेत.
संतुलित व पुरेसा आहार व नियमित व्यायाम महत्वाचे असून जीवनशैलीशी निगडीत आजार टाळायला हवेत.
*डॉ अतुल ढगे
मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.
माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी*
www.mindcareonline.com
Comments