आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांनी लिहिलेला लेख ... आपणही वाचा, दुसर्यांनाही पाठवा

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने
1987 पासून दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरूध्द दिवस म्हणून पाळला जातो. या जगाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विविध कार्य करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. दरवर्षी विविध व्यक्ती, समुदाय किंवा जगभरातील विविध संस्था अंमली पदार्थामुळे समाजात व आरोग्यविषयक निर्माण होणार्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करत असतात. 
                              यावर्षीच्या अंमली पदार्थ विरोधी दिनाचे घोषवाक्य आहे, “आरोग्य आणि मानवतावादी संकटादरम्यान अंमली पदार्थांच्या आव्हानांचा सामना करताना”. मागील दोन ते तीन वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत जे सर्व जगावरील आरोग्यविषयक मोठे संकट होते आहे. कोरोनाच्या साथीने वाढत्या आर्थिक अडचणी आणल्या आहेत. त्यामुळे विषमता, गरिबी,मानसिक तणाव वाढ झाली आहे.त्यामुळे आधिच असुरक्षित भावना असलेले  लोक अंमली पदार्थांच्या वापरामुळे झुकु शकतात. त्यासोबतच आता 2022 मध्ये अफगाणिस्थान, युक्रेन आणि त्यासोबत सर्व जग मानवतावादी संकटाच्या छायेखाली आहे. अशा संकटाच्या काळात विविध प्रकारच्या तणावाला अडीअडचणीला सामोरे जात असताना अंमली पदार्थाचा वापर व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही गट फायदा घेत असल्याने अंमली पदार्थांची तस्करी यामध्ये खूप मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थ वापरणारे लोक, अंमली पदार्थाचे व्यसन लागलेले लोक तसेच इतर मुले व तरूणासह सर्व असुरक्षित लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
         2021 चा जागतिक अंमली पदार्थाचा अहवाल अफू, कोकेन, चरस, गांजा (कॅनाबिस), अंफेटामाईन प्रकारचे उत्तेजक आणि नविन सायकोअॅक्टिव पदार्थ यांचा वापर वाढल्याचे दर्शवते. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (UNODC) ने जारी केलेल्या 2021 वर्ल्ड ड्रग रिपोर्टनुसार, 2020 साली जगभरात सुमारे 275 दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा (अंमली पदार्थांचा) वापर केला, तर 36 दशलक्षाहून अधिक लोक अंमली पदार्थांची व्यसनाधीनता या आजाराने ग्रस्त झाले. ताज्या जागतिक अंदाजानुसार, 15 ते 64 वर्षे वयोगटातील सुमारे 5.5 टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात किमान एकदा तरी अंमली पदार्थाचा वापर केला आहे, तर 36.3 दशलक्ष लोक, किंवा ड्रग्स वापरणार्‍या एकूण लोकसंख्येपैकी 13 टक्के लोकाना अंमली पदार्थाच्या व्यसनाचा आजार झाला आहे. 2010-2019 दरम्यान ड्रग्ज वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत जागतिक स्तरावर ड्रग्ज वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ होईल असे समजले जात आहे. बहुतेक देशांनी साथीच्या आजारादरम्यान गांजाच्या वापरात वाढ झाल्याचे नोंदवले आहे. त्याशिवाय 77 देशांमधील आरोग्य व्यावसायिकांच्या सर्वेक्षणात, 42 टक्के लोकांनी गांजाचा वापर वाढल्याचे प्रतिपादन केले. याच काळात वैद्यकीय वापराच्या औषधांच्या गैर-वैद्यकीय वापरातही वाढ दिसून आली आहे. जागतिक स्तरावर, 11 दशलक्षाहून अधिक लोक अंमली पदार्थाचे इंजेक्शन घेतात असा अंदाज आहे, त्यापैकी निम्मे हेपेटायटीस सी सह जगत आहेत. ओपिओइड्स संबंधी अंमली पदार्थाचा वापर हा यासाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.          
                    यात चांगली बाब ही आहे की  विज्ञान-आधारित औषधी उपचार भूतकाळाच्या तुलनेत आता अधिक उपलब्ध आहेत. मेथाडोन आणि ब्युप्रेनॉर्फिन ही दोन औषधे गेल्या दोन दशकांमध्ये वाढत्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत ज्यांचा वापर ओपिओइड वापर विकार असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी केला जातो. इतर अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनते वरही इतर चांगले उपचार उपलब्ध झाले आहेत. अंमली पदार्थाच्या वापरामुळे  होणार्या धोक्यांची कल्पना नसल्यामुळे किंवा पूर्ण माहिती नसल्यामुळे अंमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या अंमली पदार्थांविरोधात जनजागृती झाल्यास व तरूणांना हे प्रशिक्षण दिल्यास तरूण माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील त्यामुळे अंमली पदार्थाचा वापर थांबवला जाऊ शकतो किंवा त्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न करू शकतील, असे त्या अहवालात दर्शवण्यात आले आहे. 
           तरुण वया मध्ये व्यसनास सुरुवात करण्याची दोन कारणे असतात एक म्हणजे प्रयोग किंवा ते कसे असते पाहण्यासाठी आणि दुसरे म्हणजे समवयस्क मित्रांचा दबाव. आपल्यास व्यसन होण्याची 15% शक्यता असू शकते हे लक्षात घ्या. आरोग्यवर, वैयक्तिक, कौटुंबिक जीवनावर, अभ्यासवर व पर्यायाने करीयर वर त्याचा परिणाम होऊ शकतो हे लक्षात ठेवा.  आपल्या स्वतःला व आपल्या कुटुंबाला या व्यसनापासून वाचवायचे असेल तर महत्त्वाचे आहे ते या वस्तूंपासून लांब राहणे व त्याचा पहिल्या वेळीच वापर न करणे किंवा त्याचा प्रयोगच न करणे. नकार द्यायला शिका, व्यसनांना नाही  म्हणायला शिका. मित्रांना नाही म्हणायला शिका.
  मित्र तुम्हाला व्यसनाची वस्तुचा प्रयोग करण्यास प्रवृत्त करत असेल तर काय कराल?
1. मज्जा मस्ती करण्याचे इतर पर्याय द्या.
2. नशा न करता एकदा आनंदाचा क्षण एन्जॉय करणे चांगल्या आठवणी देऊन जातात
3. एखादा छान चित्रपट पाहणे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सफर करणे, ट्रेक करणे, खेळ खेळणे याचा पर्याय दया.
4. एखाद्या तेवढ्याच आनंददायी पण निरोगी अशा खाद्य किंवा पेयाचा आस्वाद घेणे.
5. आपल्याला मित्र सोडून जातील आपण एकटे पडू या भीतीत त्यांची संगत किंवा त्यांच्या सोबत व्यसन करू नका. तुमचा निर्णय जाणून सुद्धा जर काही मित्र तुम्हाला वाममार्गाकडे नेणार असतील तर अशा मित्रांपासून अशा गोष्टीबाबत दूर राहा.
६. आपल्या आवडी निवडी जुळतील अशा खेळ/ संगीत /अध्यात्मिक/ सांस्कृतिक ई. गटामध्ये सामील व्हा. तिथे मित्र बनवा.  
मुलांमधील व्यसन पालक कसे ओळखू शकतात?
1. अचानक पणे स्वभावात बदल होणे.
2. भूक कमी लागणे / जेवण न करणे किंवा वेळेवर न करणे. 
3. स्वतःकडे, स्वतःच्या दिसण्याकडे दुर्लक्ष होणे .
4. अवेळी झोपणे व उठणे.
5. एकटे राहणे. उदासिनता, नैराश्य, त्रासिकपणा चिडचिड अशी लक्षणे दिसणे.
6. अवेळी घरी येणे, मित्रांच्या संगतीत जास्त राहणे.
7. डोळे लालसर आणि सुजल्यासारखे दिसणे
8. अभ्यासाकडे दुर्लक्ष, बेजबाबदारपणा (शाळेत जाणे टाळणे).
9. पुढे,पुढे व्यसनाधिनता वाढू लागल्यावर इतर काही लक्षणे दिसू लागतात. विशेषतः व्यसनाधीन मुलगा किंवा मुलगी सकाळी उठल्यावर ही लक्षणे प्रकर्षाने दिसतात ती अशी : अस्वस्थता, डोळे आणि नाकातून पाणी येणे, पोटात गोळे येणे, जुलाब किंवा उलट्या होणे, मानसिक गोंधळ इ.

मुलांना मादक पदार्थापासून व्यसनांपासून कसे दूर ठेवाल.
1. मुलांमध्ये इंटरेस्ट घ्या. त्यांना वेळ द्या. 
2. त्यांना व्यसनाविषयी शिक्षित करा. स्वतःमाहित घ्या त्यांना माहिती द्या. 
3. तुम्ही स्वतः सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर रहा. 
4. आनंदी राहण्याचे इतर मार्ग त्याना दाखवा व अवलंब करा. 
5. स्वाभीमानाला खतपाणी घाला. 
6. त्यांना नाही म्हणायला शिकवा. आयुष्यभर स्वतःच्या शरीरासोबत राहायचे आहे मित्रांसोबत नाही हे सांगा.
7. गरजेप्रमाणे व्यवसायिक मदत घ्या, मनोविकारतज्ञ, समुपदेशक यांची मदत घ्या.

अंमली पदार्थांविषयी माहिती सर्वांपर्यत पोहचवून, त्यामुळे होणारी आरोग्याची हानी याबाबत जनजागृती करून त्यास प्रतिबंध करणे, थांबवणे व गरजे प्रमाणे उपचार करणे हे महत्वाचे आहे.

Comments

Unknown said…
Really great sir
Sunil B Gaikwad said…
Best way of Information Sir... 👌👌👌
Really Hats off to you...
Saniya kamble said…
खुप सुंदर सर 👌👌👌
Jayant said…
नमस्कार डॉक्टर साहेब, तुमच्या लेखमालेतील प्रत्येक लेख खूप सोप्या भाषेत असतो व माहितीपूर्ण असतो.

या लेखातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे "मुलांना वेळ द्या". यातूनच खुपकाही साध्य करता येईल.

असेच लिहित रहा. जनजागृती होत राहील...

आभार

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness