लेख मालिका – गोष्टी मनाच्या भाग २ – इन गोलीयो के बारे में तुम क्या जानो रमेश बाबू
लेख मालिका – गोष्टी मनाच्या
भाग २ – इन गोलीयो के बारे में तुम क्या जानो
रमेश बाबू
रमेश
आता ठीक झाला होता. तो रोज ऑफिसमध्ये जात असे सर्व कामे व्यवस्थित करत असे. त्याला
“आता 100% बरे वाटले की अजून ४-५ महिन्याचा कोर्स करून औषधे बंद करूयात असे सांगितले.
परंतु परत बरेच दिवस रमेश फॉलो अप ला आला नाही. अचानक एक दिवस मला रमेश च्या
भावाचा फोन आला. “डॉक्टर मी रमेश चा भाऊ बोलतो आहे. रमेश ला चैतन्य हॉस्पिटल मध्ये
अॅडमिट केले आहे. तुम्ही त्याला तपासायला याल का?” असे
म्हणून तो फोनवरती रडायला लागला. प्रथमता मला तो कोण आहे हे आठवले नाही. कारण
बऱ्याच वेळ एवढ्या पेशंटस मधून ती विशिष्ठ व्यक्ति आठवणे अवघड असते. मी त्याला
शांत होण्यास सांगितले व मी संध्याकाळी माझे ओपीडी पेशंट तपासून झाले की येतो असे
सांगितले.
संध्याकाळी
तिथे गेल्यावर कळाले. व्यवस्थित झाल्यानंतर रमेशला वाटले आता मी चांगला झालो आहे. माझा आजार बरा झाला आहे, मी कशाला गोळया घेऊ?. एक दिवस गोळ्या घ्यायला गेल्यावरती तिथे
मेडिकल स्टोअर मध्ये कामाला असलेल्या मुलाने सांगितले या झोपेच्या गोळ्या असतात, कशाला
घेतो त्याची सवय लागते. त्यामुळे रमेशने गोळ्या घेणे बंद केले. आई वडीलांचेही
दुर्लक्ष व्हायला लागले. अशात एक दीड महिने जाताच परत त्रास व्हायला लागला. हळू
हळू पहिली होती तशी लक्षणे डोके वर काढायला लागली. राहुलच्या मनात त्या मेडिकल
मधल्या मुलाने सांगितलेली गोष्ट अजूनही होती, म्ह्णून होणारा त्रास त्याने कोणालाही
सांगितला नाही. त्याचा त्रास वाढतच गेला स्वतःबद्दल, इतरांबद्दल
व प्रामुख्याने भविष्याबद्दल नकारात्मक विचार त्याच्या मनात येऊ लागले. आपले
काहीही चांगले होणार नाही असे त्याला वाटू लागले, ते
विचार एवढे तीव्र झाले की एक दिवस त्याने स्वतःला संपवायचा विचाराने घरातील
शेतातील कीटक नाशक औषध घेतले. सुदैवाने उलट्या चा त्रास होऊ लागल्याने घरच्यांच्या
लक्षात आल्यावर माञ त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केले. ICU मध्ये
तीन चार दिवसानंतर त्याची प्रकृती हळूहळू स्थिर होऊ लागली परंतु धोका अजून टळला
नव्हता. आपण चुकीचे वागलो हे समजूनही रमेशच्या मनातील मरणाचे विचार जात नव्हते.
आपण मेलो असतो तर बरे झाले असते असे विचार मनात सतत डोकावत होते. डॉक्टरांनी
घरच्यांना मानसिक आजार होता का असे खोदून विचारल्यावर घरच्यांनी उपचार करणाऱ्या
डॉक्टरना मानसिक आजाराची माहिती दिली व डॉक्टरांनी त्यांना मनोविकार तज्ञाचा सल्ला
घेऊ असे सांगितले. म्हणून त्याच्या भावाने मला फोन करून मला रमेशला तपासण्यासाठी
बोलवले होते. मी परत त्याच्याशी बोललो व औषधे परत चालू केली.
आत्महत्येचे तीव्र विचार लक्षात घेऊन मी
घरच्यांना योग्य काळजी घेण्यास सांगितले. तसेच हे विचार पाच सहा दिवसात कमी होतीलच
पण कमी न होता तसेच राहिले किंवा वाढत गेले तर मात्र आपल्याला विद्युत लहरी उपचार
म्हणजे शॉक ट्रीटमेंट चा उपचार करावे लागेल असे सांगितले. त्याच्या मनातील शॉक
ट्रीटमेंट विषयी अनेक प्रश्न व शंका लक्षात घेऊन त्यांनी सर्व वैज्ञानिक माहिती
देऊन त्यांचे गैरसमज दूर केले. सुदैवाने तीन चार दिवसातच त्याचे आत्महत्येचे विचार
कमी झाले व तो बरा होऊ लागला. मग मी त्यांना ५ दिवसांनी ओपीडी मध्ये फॉलोअप साठी येण्यासाठी सांगितले. रमेशचा
ओपीडी मध्ये आल्यावर पहिला प्रश्न हा होता. “मानसिक
आजाराच्या गोळ्या झोपेच्या गोळ्या असतात का?” “हा खूप मोठा गैरसमज आहे. हे 2020
आहे. औषधाने व विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. तो 1950 चा काळ होता. जावेळी
मानसिक आजारासाठी उपचार उपलब्ध नव्हते त्यावेळी मानसिक आजाराच्या रुग्णांना बांधून
ठेवावे लागत असे किंवा झोपेचे इंजेक्शन किंवा गोळ्या देऊन शांत करावे लागत असे
किंवा झोपून ठेवावे लागत असे. 1960 नंतर मात्र शोध होऊन मानसिक आजारवरची खूप
चांगली औषधे बाजारात यायला लागली. त्या झोपेच्या गोळ्या नसून, त्या
आजारावरती काम करणाऱ्या गोळ्या असतात. आज विविध मानसिक आजारावर काम करणाऱ्या परंतु
जास्तीची झोप हा साईड इफेक्ट नसलेल्या अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत.” मी
म्हणालो.
मग तरीही या गोळ्यांनी झोप का लागते? -इती रमेश
“सर्वच गोळ्यांनी आणि सर्वच रुग्णांना जास्तीची झोप लागत नाही. यात तीन गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिले म्हणजे
काही रुग्णांना सुरवातीच्या काळात झोपेची गरज असते. जर तो रुग्ण जास्त त्रास करत
असेल, स्वताला किंवा
इतरांना त्रास करत असेल, तोडफोड
मारामारी करत असेल तर मात्र सुरुवातीला त्याला झोपेच्या गोळ्या किंवा इंजेक्शन
देणे व झोपवून ठेवणे गरजेचे असते नंतर मात्र ५-१० दिवसात ती औषधे बंद केली जातात. त्यामध्ये
ही ठराविक औषधे गरजेची असतात. दुसरे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे
असल्याने काही वेळा होणारे परिणाम हे वेगळे होतात. त्यामुळे काही जणांना काही औषधामुळे जास्तीची झोप लागणे हा साइड
इफेक्ट होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास सर्वच मानसिक आजारामध्ये झोप न लागणे
हे एक महत्त्वाचे लक्षणं असते व त्या रुग्णाचे मागचे बरेच दिवस पुरेशी झोप झालेली
नसते. अश्यात औषधोपचारानंतर ज्यावेळी सर्व नॉर्मल वर यायला लागते त्यावेळी शरीर
एवढ्या दिवसाची राहीलेली झोप भरून काढण्याचा प्रयत्न करते व जास्तीची झोप लागते.
सात-आठ दिवसानंतर मात्र परत झोप व्यवस्थित येऊ लागते. त्यामुळे जास्त झोप लागत
असल्यास व्यक्तींनी एक आठवडा वाट पाहायला हवी व तरीही झोप जास्त लागत असल्यास
मनोविकार तज्ञाला दाखवायला हवे, ते आवश्यकते नुसार त्यात बदल करू शकतात.” मी
दोघांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो.
“मानसिक आजाराच्या औषधाचे इतर खूप सारे साइड इफेक्ट असतात का”? रमेश च्या भावाने विचारले. मी त्याला सांगितले “हा एक खूप मोठा
गैरसमज आहे. जसे इतर औषधे आहेत मग ती अॅलोपॅथीची इतर औषधे असो किंवा आयुर्वेदिक
किंवा होमिओपॅथीक, प्रत्येकाचा
काहीतरी साइड इफेक्ट असतो. कारण कुठलाही पदार्थ शरीरात गेल्यास त्याचा इफेक्ट हा
शरीरावर होणारच. जर कोणी म्हणत असेल आमच्या औषधांचा साइड इफेक्ट होत नाही तर लक्षात ठेवा की त्याचा इफेक्ट ही होत नाही.
परंतु हो सर्वच गोळ्यांचा, सर्वांवरच
साइड इफेक्ट होत नाही. प्रत्येक रुग्णाचे शरीर वेगवेगळे असते व त्यामुळे
प्रत्येकाच्या शरीरावर होणारा इफेक्ट व साइड इफेक्ट वेगवेगळा व वेगवेगळ्या
प्रमाणात असू शकतो. 3-5% रुग्णांमध्ये जशा इतर औषधांचा साइड इफेक्ट होऊ शकतो तसाच
मानसिक आजाराच्या औषधांचाही साइड इफेक्ट होऊ शकतो. अश्यावेळी रुग्णांनी किंवा
नातेवाईकांनी घाबरून औषधे बंद करण्याऐवजी उपचार करणाऱ्या मनोविकार तज्ञाला
दाखवायला हवे, ते
औषधामध्ये योग्य ते बदल करतील.”
“मानसिक
आजाराच्या औषधामुळे मेंदू बधिर होतो तो व्यवस्थित काम करत नाही का? कारण आमच्या गावातील एक मुलगा ज्याला मानसिक आजार झाला होता तो फक्त बसून असतो, काहीही करत नाही,
त्याला जास्त काही समजत नाही.” रमेश ने विचारले. मी त्यांना समजावायचा प्रयत्न करत
म्हणालो, “हा ही एक खूप मोठा गैरसमज आहे. पूर्वी सांगितल्या प्रमाणे आपण
2020 मध्ये जगतोय. खूप चांगली औषधे आज उपलब्ध आहेत. औषधामुळे मेंदू बधिर होत नाही.
किंबहुना लगेच औषधोपचार सुरू न केल्यास तो व्यवस्थित पूर्ण न केल्यास व आजार वाढत
गेल्यास, स्किझोफ्रेनिया
सारख्या आजाराच्या काही रुग्णांमध्ये आजारामुळे मेंदू बधिर होऊ शकतो. किंवा मेंदू
व्यवस्थित काम करत नाही. हा गोळ्यांचा साइड इफेक्ट नसतो. उलट औषधे मानसिक आजाराला
कंट्रोल करून त्यामुळे मेंदुवर होणारा हा परिणाम थांबवण्यास मदत करतात.” कदाचीत
त्यांच्या डोक्यात आता प्रकाश पडायला लागला होता. तुम्ही ज्या रुग्णाबद्धल बोलत आहात
त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व मानसिक तपासणी केल्याशिवाय हे कळणे अवघड आहे. एकतर त्याचा उपचार
व्यवस्थित झाला नसावा, किंवा तो पाहिल्यापसून मतिमंद किंवा गतीमंद असावा किंवा मग
त्याला आजारासोबत गांज्याचे व्यसन असावे किंवा मग नेगेटिव सीजोफ्रेनियाचा प्रकार
असावा.” मी समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. शेवटची गोष्ट त्यांच्यासाठी बाऊन्सर
असला तरीही पहिल्या गोष्टी त्यांना नक्कीच समजल्या असणार याची खात्री होती.
“म्हणजे मानसिक आजाराच्या औषधाचे काही साइड इफेक्ट नाहीत आणि ते
पूर्ण सेफ आहेत असे आहे का?”
रमेश च्या भावाने आता माझ्यासाठी बाऊन्सर टाकला. पण मी
तयार होतो. हा बाऊन्सर माझ्यासाठी नवीन नव्हता. “नाही, नक्कीच असे नाही. प्रत्येक औषधाचे काही साइड इफेक्ट असतात. तसेच
याचेही असतात. परंतु ते सगळ्यांनाच होतील असे नाही . व्यक्तीच्या शरीरानुसार
त्याचे प्रमाण व स्वरूप बदलू शकते. औषधाचा फायदा जास्त होतोय की तोटा जास्त होतोय
हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवून योग्य निर्णय घ्यायला हवा.”
“मी तुम्हाला बाकी साइड इफेक्ट बद्दल न सांगितलेलेच बरे कारण तुम्हाला ते माहीत झाले तर तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी बद्धल जास्तच
विचार कराल. आणि सगळ्याच गोळ्यांच्या सगळेच साइड इफेक्ट सांगायचे म्हटले तर दिवस
पुरणार नाही. परंतु तुम्हाला जेंव्हा केंव्हा काही साइड इफेक्ट जाणवेल, किंवा काही
त्रास जाणवेल किंवा स्वत मध्ये काही बदल जाणवेल तेंव्हा नक्की सांगा. जर तो तुम्हाला दिलेल्या गोळ्यांचा साइड इफेक्ट असेल तर आपण
त्यात गरजेप्रमाणे डोस कमी करुयात, किंवा बदल करुयात किंवा मग त्यासाठी इतर काय
पर्याय शोधत येईल हे बघूयात.” मी त्यांना सांगितले.
“परंतु सर नेहमी औषधे घेतली
तर त्याचा परिणाम होणारच ना?, कारण असे म्हणतात की मानसिक
आजाराच्या औषधाची सवय लागते आणि ती कायम स्वरूपी आयुष्यभर घ्यावी लागतात. मी कधीच
बरे होणार नाही का? व आयुष्यभर मला अशाच गोळ्या घ्याव्या लागतील का”? रमेशने
काळजीच्या सुरात विचारले.
“नाही. मानसिक आजाराच्या
औषधांची सवय लागत नाही परंतु ती औषधे किती दिवस घ्यावी लागतील किंवा आयुष्यभर
घ्यावी लागत का हे मात्र विविध गोष्टीवरती अवलंबून असते. आजार सुरू झाल्यानंतर
लवकरात लवकर ( 1-2 महिन्याच्या आत) उपचार चालू केल्यास डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार पहिल्याच वेळी व्यवस्थित व पूर्ण उपचार करून डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार औषधे कमी करून हळूहळू बंद केल्यास व कारण शोधून, त्याप्रमाणे काही
मानसिक व जीवनशैलीत विषयक बदल केल्यास
मानसिक आजार परत होण्याची शक्यता खूप कमी राहते. परंतु आपल्याकडे बऱ्याच
वेळा आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे लक्षणे लक्षात यायला वेळ जातो. लक्षणे लक्षात
यायला लागल्यावर बाबा,बुवा करण्यात व मनोविकार तज्ञाकडे ( वेड्याच्या
डॉक्टरांकडे) गेल्यास लोक काय म्हणतील या विचारात बरेच दिवस जातात. आणि ते आजार
कायम स्वरुपी होतात. औषधोपचार चालू केला तरी आता बरे वाटते म्हणून इतरांच्या
सांगण्यावरून व गैरसमजामुळे तो पूर्ण करण्याऐवजी आधीच बंद केला जातो. पहिल्या वेळी
आजार झाल्यास 6 ते 8 महिने तर दुसऱ्या वेळी झाल्यास 2 ते 5 वर्षे
उपचार करणे गरजेचे असते. तो पूर्ण न केल्यास किंवा तिसऱ्या वेळी आजार झाल्यास तो
आजार कायम स्वरूपी होतो. मानसिक आजाराचे मानसिक किंवा सामाजिक कारण असल्यास ते
शोधणे त्याचा योग्य तो पर्याय / उत्तर शोधणे,
गरजेनुसार मानसिक व जीवनशैली विषयी
बदल ( झोप, जेवण, व्यायाम) न केल्यास व तो आजार कायम स्वरूपी झाल्यास
मग मात्र ब्लड प्रेशर, डायबेटीस या प्रमाणे मानसिक आजारामध्ये ही कायम
स्वरूपी औषधे घ्यावी लागतात. आपण प्रेशर च्या गोळ्यांची किंवा डायबेटीस च्या
गोळ्यांची सवय लागली असे म्हणत नाही. तसेच या गोळ्यांचीही सवय लागत नाही तर
रुग्णाच्या काही चुकांमुळे किंवा काही वेळा जैविक कारणामुळे तो आजार कायम स्वरूपी
होतो व त्याची कायम स्वरुपी औषधे चालू ठेवावी लागतात.” मी सांगितले.
“म्हणजे मला आता २ ते ५ वर्ष औषधे
घ्यावी लागतील का?” रमेशच्या चेहऱ्यावर नाराजी पूर्ण पणे दिसत होती. “हो कदाचीत,
कारण मागच्या चुकीमुळे आपला पहिला गोल्डन चान्स गेला आहे. परंतु आपल्याकडे हा
दूसरा आणि कदाचित शेवटचा चान्स आहे. व्यवस्थित फॉलो अप ठेवून औषधाचा कोर्स पूर्ण
केला तर नक्कीच आपण २ वर्षात पूर्ण करू व त्यातही आता सह महिन्यानंतर पुढील दीड
वर्षा साठी फक्त एक गोळी वर ठेवण्याचा प्रयत्न करू.” मी त्यांना आश्वासन देत
म्हणालो.
“ओके सर ठीक आहे. मागच्या
वेळी सारखी चूक मी यावेळी करणार नाही”. ते
ठीक आहे म्हणून उठले आणि जायला निघाले. मी बेल वाजवून पुढील पेशंट पाठवण्यासाठी
सिस्टर न सूचना केली.
-क्रमश:
डॉ अतुल ढगे,
मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.
माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी.
Comments