लेख मालिका – गोष्टी मनाच्या भाग 3 - टिक टिक वाजते डोक्यात
*कोरोना पूर्वी हा आजार होताच पण कोरोना च्या काळामध्ये भरपूर
लोकांमध्ये हा आजार वाढत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिति मुळे कोरोना होऊन
गेलेल्या रुग्णामध्ये व इतर लोकांमध्येही हा आजार दिसून येत आहे.* जाणून घ्या काय असतात हे भीतीचे झटके
किंवा पॅनिक अटॅक चा आजार. कसा ओळखायचा हा आजार?, कोणाकडे उपचार घ्यायचा?, होऊ
नये म्हणून काय करता येईल?
याच्या बद्दल च्या प्रश्नाचे उत्तर देणारी गोष्ट प्रत्येकाने वाचायलाच हवी... *डॉ
अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक
समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड
सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी*
यांनी लिहिलेली मनाची गोष्ट... आपणही वाचा, दुसर्यांनाही
पाठवा
लेख मालिका – गोष्टी मनाच्या
भाग 3 - टिक टिक वाजते डोक्यात
"टिकटिक वाजते डोक्यात, धडधड
वाढते ठोक्यात" किती रोमँटिक ना. प्रेमात पडताना किंवा प्रेमात पडल्यावर हे
रोमँटिक वाटू शकते, पण
विनाकारण हे होत असेल तर? धडधड वाढणाऱ्या हृदयाच्या ठोकयांसोबत छातीत
कळ येत असेल आणि श्वास घायला त्रास होत असेल तर?. आणि त्यासोबतच घाम फुटत असेल, हात
थरथर कापत असतील आणि आता माझे काही खरं नाही मी आता मरणार असे वाटायला लागले तर मग
मात्र ते रोमँटिक न वाटता भयानक वाटायला लागते. त्यातही वय ४५ पेक्षा जास्त असेल, ECG (छातीची पट्टी) मध्ये
बदल झाला असेल तर डॉक्टर हृदयविकाराचे निदान करून उपचार करू शकतात व बरे वाटू
शकते. पण वय ४५ पेक्षा
कमी असेल, ECG (छातीची पट्टी) मध्ये काहीच बदल नसतील, सर्व
रिपोर्ट नॉर्मल असतील व डॉक्टर ही काही झाले नाही असे म्हणत असतील किंवा BP(ब्लड
प्रेशर) वाढला आहे म्हणून BP(ब्लड प्रेशर) ची
गोळी चालू करूनही आराम पडत नसेल व सततच हा असा त्रास होत असेल तर मग मात्र डोक्यात
पण टिकटिक वाजायला चालू होते. आणि एका चांगल्या आयुष्याचे रूपांतर त्रासदायक
आयुष्यात रूपांतर व्हायला लागते.
नागेश 35
वर्षाचा असून एका कंपनीमध्ये कामावरती होता. एक दिवस काम चालू असताना अचानक त्याला
धडधड व्हायला लागली, बैचेनी वाटायला लागली, छातीत
दुखतेय, श्वास कोंडतोय असे त्याला वाटले.
त्याचे सहकारी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना
तपासले. ECG (छातीची
पट्टी) केला. फक्त ब्लड प्रेशर थोडेसे वाढले
होते. तपासण्या सर्व नॉर्मल आल्या एव्हाना नागेशचा त्रासही आता कमी झाला होता.
डॉक्टरांनी त्यांना काही त्रास नाहीये फक्त थोडा आराम करा म्हणून त्यांना पाठवून
दिले. परत दोन-तीन वेळा त्याला असाच त्रास झाला. एका वेळी तो जवळच्या जनरल
प्रॅक्टिशनर कडे गेला. त्यांनी परत सर्व रिपोर्ट करून घेतले. ECG (छातीची
पट्टी) सह सर्व नॉर्मल होते. आता आजकाल कमी वयामध्ये ही हार्ट अटॅक येतो आहे
म्हणून त्यांनी ब्लड प्रेशर ची गोळी, चरबीची गोळी व
रक्त पातळ होण्याची गोळी चालू केली. गोळ्या चालू करूनही फरक मात्र काहीच पडला
नव्हता. पूर्वी आठवड्यातून एकवेळ होणारा त्रास रोजच व्हायला लागला, त्या गोळ्या चालू असतानाही. मग ते इतरांच्या
सल्ल्यावरून हृदयाच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे
रत्नागिरीला आले तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासले व जुने सर्व रिपोर्ट व ECG (छातीची
पट्टी) पाहिले. अर्थातच 2-3 वेळा रिपोर्ट व ECG नॉर्मल
असल्यामुळे व वयही कमी असल्यामुळे त्यांनी हृदयाचा काही आजार किंवा त्रास नही असे
सांगितले. कदाचित हे मानसिक असण्याची शक्यता जास्त आहे असे सांगून त्यांना मला
म्हणजे मनोविकारतज्ञाला दाखवण्याचा सल्ला दिला व ते माझ्याकडे आले.
मी त्यांची सर्व
प्राथमिक माहिती घेतली व जुनी फाईल व रिपोर्ट पहिले व त्यांच्याकडून माहिती
घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही मागील 2
महिन्यापासूनची सर्व माहिती सांगितली. दुसरा कसल्याही प्रकारचा शारीरिक त्रास
किंवा आजार नव्हता. "ज्यावेळी हा त्रास होतो त्यावेळी नेमके काय काय होते, शरीरामध्ये
नेमका काय काय बदल जाणवतो?” मी त्यांना विचारले. “बसल्या बसल्या
अचानक धडधड व्हायला लागते, मग हळूहळू ति धडधड वाढत जाते आणि छातीत
गच्च वाटते व श्वास कोंडतोय की काय असे वाटते. मग घाम फुटतो नि हात पाय थरथर
कापायला लागतात." नागेशने सांगितले. "पोटात गोळा आल्यासारखा वाटतो का? जोराची
व कंट्रोल होणार नाही असे वाटणारी लघवीची किंवा संडासची कळ येते का? हातापायाला
मुंग्या येतात का? चक्कर किंवा घेरी येते का?" मी
त्यांना विचारले. त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे हो होती. "अशावेळी मनात
नेमके काय चालू असते?" मी त्यांना विचारले. “मनात खूप बैचेनी
वाटते, सतत इकडे तिकडे फेऱ्या माराव्या
वाटतात. कोणीतरी सोबत असावे वाटते. ज्यावेळी जास्त त्रास होतो त्यावेळी तर आपला
जीव जातोय की काय किंवा मला आता वेड लागतेय की काय असे वाटायला लागते. काहीवेळा तर
मी बायकोला मला घट्ट धरून बसायला सांगतो. मला आता लगेच डॉक्टरांकडे घेउंन चला, असे
सांगतो. कित्येक वेळा मी मध्यरात्री डॉक्टरांकडे गेलो आहे. पण सर्व डॉक्टर तपासणी
नंतर सांगतात नॉर्मल आहे म्हणून" नागेशने सांगितले. "हा असा त्रास किती
वेळ चालतो. नेहमी सतत चालूच असतो की १५-२० मिनिटाने आपोआप कमी होतो?" मी
विचारले. हो १५-२० मिनिटाने किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासात पूर्ण त्रास कमी
होतो. का होते मला असे डॉक्टर मला नेमके काय झाले आहे?" त्यांने थांबून विचारले.
"तुम्हाला
भीतीचे झटके अर्थात पॅनिक अटॅक नावाचा त्रास आहे" मी त्यांना सांगितले.
"हा
मानसिक आजार आहे का? आणि हे कशावरून कळाले रिपोर्ट तर
नॉर्मल आहेत?" नागेशच्या भावाने विचारले.
“हो हा मानसिक आजारच आहे परंतु हा वेडसरपणाचा प्रकार नाही. सगळेच
मानसिक आजार हे वेडसरपणाचा प्रकार नसतात. तो फक्त १०% भाग असतो. तुम्ही दिलेली
पूर्ण माहिती लक्षणे व जुने रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणूनच आपण हे निदान केले आहे.” मी
सांगितले.
धडधड होणे, घाम फुटणे, थरथर कापणे, श्वास
घ्यायला त्रास होणे / दम / धाप लागणे / दम
कोंडणे, छातीत दुखणे, हात-पायाला मुंग्या येणे, बैचेन वाटणे, पोटात त्रास होणे(गोळा येणे), मळमळ होणे, जोराची व कंट्रोल होणार
नाही असे वाटणारी लघवीची किंवा संडासची कळ येते मला काही तरी होईल, माझा जीव जाईल असे वाटणे. या पैकी कुठलीही ४ लक्षणे दिसून येत असल्यास त्याला भीतीचे झटके
असे म्हणतात. हे अचानकपणे व सतत येत राहतात. असे झटके आल्यानंतर साधारण १५ ते ३०
मिनिटे त्रास होतो व नंतर आपोआप त्रास कमी
होतो. यामध्ये
रुग्णाला मनामध्ये तीव्र स्वरूपाची भीती व बैचेनी वाटते ही भीती वाटण्यासाठी कुठले
कारण असायलाच पाहिजे असे नाही. सुरुवातीला काही कारणाने तर नंतर नंतर विनाकारण व
अचानक पणे हा त्रास व्हायला लागतो.
बऱ्याच वेळा अशा रुग्णास लगेचच जनरल फ़िजिशिअन कडे दाखवले जाते.
तपासणी मध्ये सर्व नॉर्मल आढळून येते. छातीची पट्टी (ECG), प्रेशर (blood pressure) नॉर्मल असल्याचे डॉक्टर सांगतात. सदर ची लक्षणे
हृदयाचे झटके (HEART ATTACK) शी मिळते जुळते
असल्याने हार्ट अटॅक असल्यासारखे वाटते. काही डॉक्टरांना या मानसिक आजारबद्दल माहीत
नसते व ब्लड प्रेशर जास्त आल्यास (जे नॉर्मली तात्पुरत्या वेळासाठी वाढू शकते) त्यांना उच्च
रक्तदाब किंवा हार्ट अटॅक समजून उपचारही केला जातो व मग त्या गोळ्या आयुष्यभर
रुग्णाला विनाकारण घ्याव्या लागतात. काही डॉक्टर ज्यांना या आजारबद्दल माहीत असते ते मनोविकारतज्ञाचा सल्ला
घ्यायला सांगतात परंतु बरेच जन मला कुठे वेड लागलय अस म्हणून टाळतात. आणि या डॉक्टर
कडून त्या डॉक्टर कडे फिरत राहतात, तपासण्या करत राहतात. अर्थातच रीपोर्ट तर नॉर्मल
येतातच पण आजार काही बरा होत नाही.
जर अशी लक्षणे
सतत दिसून येत असतील व सर्व तपासण्या विशेषतः ECG (छातीची पट्टी) व प्रेशर नॉर्मल असल्यास हा हृदयाचा विकाराचा झटका
नसून तीव्र भीतीच्या झटक्याचा आजार आहे असे समजून मनोविकार तज्ञाला दाखवून
त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे गरजेचे असते.
“यामध्ये रुग्णाला मनामध्ये तीव्र स्वरूपाची भीती व बैचेनी वाटते ही
भीती वाटण्यासाठी कुठले कारण असायलाच पाहिजे असे नाही. सुरुवातीला काही कारणाने तर
नंतर नंतर विनाकारण व अचानक पणे हा त्रास व्हायला लागतो. याला भीतीचे झटके असे
म्हणतो कारण याची लक्षणे दिसायला
हृदयविकाराच्या झटक्यासारखी असतात. जरी ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखी असली
तरी यात घाबरण्यासारखे काही नसते यात हृदयामध्ये काही बिघाड झालेला नसतो.” मी त्यांना समजावायचा प्रयत्न करत होतो.
"मग हे सगळे का होते?" नागेशच्या
भावाने विचारले.
" आपल्या समोर वाघ आला किंवा आपल्यामागे
कुत्रे लागले किंवा इतर कुठलीही भीतीदायक घटना असेल तर काय होते?" मी
प्रतिप्रश्न केला.
"आपल्याला भीती वाटते. आपले काही खरे
नही असे वाटते धडधड वाटते, घाम फुटतो, हातपाय
थरथर कापतात पोटात गोळा येतो; अशा प्रकारचे बदल आपल्या शरीरात घडतात." बरोबर
की नाही?” मी त्यांना विचारले.
“पण मग हे सगळे असं काहीतरी झाले तरच होते ना. मला ते विनाकारण का
होते.” नागेश ने विचारले.
“आपल्याला जे काही वाटते, मनात विचार येतात, शरीरात बदल
होतात, यामागे विविध मेंदूमधील भाग व शरीरातील व मेंदुमधील रसायने/केमिकल कार्यरत असतात.
आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात अॅड्रीनॅलिन व एपिनेप्रीन तयार झाल्यामुळे अशा
प्रकारचे बदल होता असतात. व हे जास्त प्रमाणात तयार होण्याची सूचना मेंदूतील
लिंबीक सिस्टम (जी आपल्या भावनांशी निगडित असते.) कडून येते असते. परंतु हे सर्व
कंट्रोल मध्ये ठेवणारा एक बॉस असतो ज्याला 'सिरोटोनीन' असे
म्हणतात. हा सिरोटोनीन नावाचा बॉस तिथे असेल तर ही लिबिक सिस्टम विनाकारण अशी
सूचना देत नाही. फक्त काही भीतीदायक कारण असेल किंवा अतिउत्साहवर्धक किंवा हुरहूर वाटणारे (आपला पहिला
नंबर किंवा रोमँटिक वाले धडधड होणे) कारण असेल तर किंवा काही जास्त व जलद मेहनतीचे
काम किंवा गोष्ट करत असू तरच हे केमिकल तयार होते व हे बदल होतात. पण जर सिरोटोनिन
नावाचे केमिकल मेंदूतून कमी झाले तो बॉस तिथे नसेल तर मात्र ती लिंबिक सिस्टम
स्वैर होते व विनाकारण मध्ये मध्ये हे केमिकल तयार करते व व्यक्तीला मला त्रास
व्हायला लागतो. किंवा काही वेळ थायरॉईड ग्रंथीचा किंवा अॅडरिनल ग्रंथीचा आजार असेल तर असे होऊ शकते.” मी साध्या
भाषेत समजावायचा प्रयत्न केला.
“पण मग हे सिरोटोनीन
केमिकल कमी कशामुळे होते?” इति.
नागेशचा भाऊ
“इतर मानसिक आजाराप्रमाणेच याचे जैविक-मानसिक व सामाजिक कारणे असू
शकतात. अशा लोकांच्या जणूकामध्ये सिरोटोनीन कमी प्रमाणात तयार होणे किंवा त्याचे कार्य
कमी किंवा व्यवस्थित
न होणे अशा प्रकारचे बदल असू शकतात किंवा
होऊ शकतात. अशा व्यक्ती मध्ये अचानक काही मानसिक आघातामुळे (जवळच्या व्यक्तीचा
विरह किंवा मृत्यू, कोणाचा मृत्यू पाहणे किंवा मृत्यूची बातमी कळणे, बलात्कार, शारिरीक, मानसिक किंवा लैंगिक
छळ, अचानक होणारे आर्थिक नुकसान इत्यादी) किंवा सततच्या मानसिक व सामाजिक ताणतणावामुळे (कामाचा
तणाव, सततची हालाखीची आर्थिक
परिस्थिती किंवा सध्याची कोऱ्ओनाची
भीतीदायक परिस्थिती) सिरोटोनीन लेवल कमी होऊ शकते, व त्यांना
असा त्रास होतो. नैराश्याचा आजार, काळजीचे आजार, अनिवार्य
विचार व कृतीचा आजार (मंत्रचळेपणा) असे इतर काही आजार आहेत जे सिरोटोनीन केमिकल
कमी झाल्यामुळे होऊ शकतात. केव्हा केव्हा काही रुग्णामध्ये या विविध आजारांची
लक्षणे सुद्धा आलटून पालटून दिसू शकतात. अर्थात कधी त्या व्यक्तीला नैराश्याच्या आजाराची
लक्षणे दिसतील तर कधी काळजीच्या आजाराची तर कधी मंत्रचळेपणाची, तर काही
जणांमध्ये या सर्वच आजाराची किंवा एका पेक्षा जास्त आजाराची काही काही लक्षणे
थोडाफार प्रमाणात एकत्रित दिसू शकतात.'' मी त्यांना
समजवण्याचा प्रयत्न केला.
“मी ठीक तर होईन ना? हे केमिकल
नॉर्मल कसे होणार?” नागेशला
हे कदाचित जास्तच भीतीदायक वाटले असावे.
“हो नक्कीच काहीही
घाबरायची गरज नाही. हा आजार आहे आणि यावर औषधोपचारही आहे. उपचार केल्यावर आजार बरा होणारच. आपण औषधरूपाने
ते केमिकल शरीरात टाकले व सिरोटोनीन नावाचा बॉस मेंदूमध्ये त्याच्या खुर्चीवर बसला
की तुमची लिंबीक
सिस्टम सुताप्रमाणे सरळ होईल, आणि हा त्रास
कमी होईल. साधारणतः सहा-आठ महिने व्यवस्थित फॉलोअप ठेवून उपचार पूर्ण केला तर मग
मात्र ते केमिकल परत आपोआप व्यवस्थित प्रमाणात मेंदूत तयार व्हायला लागेल व मग ते बाहेरून
औषध स्वरूपात द्यायची गरज पडणार नाही. हा आजार
मानसिक होता व तुम्ही शारीरिक आजाराच्या डॉक्टरांकडून शारीरिक आजाराचे उपचार केले त्यामुळे
तुम्हाला बरे वाटले नाही आता आपण मानसिक आजाराचे
उपचार चालू करतोय त्यामुळे 30-40दिवसात तुम्हाला
नक्कीच आराम मिळेल परंतु रेग्युलर फॉलोअप
देऊन सहा ते आठ महिन्याचा कोर्स व्यवस्थित पूर्ण करायला विसरू नका” मी सांगितले.
आणि झालेही
त्याप्रमाणेच 20 दिवसांनी फॉलोअपला आला. “डॉक्टर याआधीच
तुमची माहिती मिळाली असती आणि तुमच्या कडे आलो असतो तर बरे झाले असते” नागेश
म्हणाला. त्याचा त्रास पूर्णपणे कमी झाला होता. त्याची ब्लडप्रेशरची, चरबीची
गोळी व रक्त पातळ होण्याची गोळी बंद केली (अर्थात या रुग्णामध्ये ती अनावश्यक होती.)
सहा महिन्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यावर हळूहळू डोस कमी करून, औषधे बंद
केली. अजून तरी परत नागेशला कधी त्रास
झालेला नाही. 'धक धक करने लगा, मोरा जियरा डरने लगा' किंवा
'टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते
ठोक्यात' अशी गाणी ऐकल्यावर मात्र नागेशला त्या त्रासाची व पर्यायाने माझीही आठवण
नक्कीच होत असेल.
डॉ अतुल ढगे,
मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ
व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.
माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी*
Comments