कोरोनाचा काळ –बालक आणि पालक

 

कोरोनाचा काळ –बालक आणि पालक

    कोरोनाच्या साथीची परिस्थिती आणि लॉकडाउन परिस्थिती फार वेगळी झाली आहे. पहिल्या लाटेचा फटका ओसरतो न ओसरतो तोच दुसरी लाट आली आणि त्यासोबत लॉकडाउन पण आणि भीतीचे वातावरण पण. याचा परिणाम सर्वांवर होतोय आणि आपल्याला समजत आहे. पण एक गट असा आहे ज्यांच्यावर होणाऱ्या परिणामाची जाणीव किंबहुना आपणांस नाहीये आणि तो गट  म्हणजे मुले.




   लॉकडाउनमुळे शाळा व कॉलेज बंद आहेत. अभ्यासाबाबत, परिक्षेबाबत सर्वत्र सावळा गोंधळ चालू आहे. मुले त्यामुळे गोंधळात आहेत. त्याचं रेग्युलर रुटीन बिघडलेले आहे आणि बाहेर जाता येत नाहीये, मित्रांना भेटता येत नाहीये. ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीन टाईम वाढलेलाच आहे, त्यासोबत इतर ऑनलाईन गोष्टीकडे ते वळत असून इंटरनेट अँडिक्शन वाढत आहे. काहीजण आर्थिक परिस्थितीबाबत आईवडिलांची घालमेल पहात आहेत. काही जण आईवडिलांच्या क्वारंटाईनमुळे त्यांच्यापासून दूर आहेत, एकटे पडत आहेत. त्यासोबतच घरात सर्वांसोबत राहून नकारात्मक बातम्या त्यांच्या कानावर व डोळ्यावर पडून मानसिक तणावात आहेत. यासर्वांचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. हे सर्व परिणाम वेळीच ओळखता आले व योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम थांबवता येऊ शकतात. सर्वात महत्वाचे आहे; हा होणारा परिणाम, हा ताण-तणाव ओळखायला शिकणे. कारण लहान मुले ताण-तणावाला मोठ्या माणसाप्रमाणे सामोरे न जाता वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातात. ते बऱ्याच वेळी बोलून दाखवत नाहीत तर ते त्यांच्या वागण्यातून जाणवते.

कसे ओळखाल मुलांमधला ताण-तणाव

1.    काही मुले घाबरट बनतात. सतत आईवडिलांना चिकटून राहतात किंवा सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतात. थोडावेळही एकटे राहू शकत नाहीत.

2.    काही मुले सर्वांपासून दूर जातात. एकलकोंडी होतात कोणाशी बोलत नाहीत मिसळत नाहीत.

3.    काही मुले चिडचिडी होतात. रागीट होतात.आदळाआपट करतात. मोठयाने बोलतात, ओरडतात, भांडणे करतात. इतरांच्या अंगावर धावून जातात. वस्तू फेकून देतात.

4.    काही मुलांमध्ये बिछान्यामध्ये लघवी करण्याची सवय येते. बिछाना ओला करतात.

5.    काही मुले गोंधळून जातात. अनेक प्रश्न त्यांना पडतात.

6.    काही मुले खूप घाबरट होतात व माझ्या आईवडिलांना किंवा घरच्यांना कोरोना होणार नाही ना अशा भीतीखाली राहतात व तसे विचारत राहत्तात.

7.    काही मुले सतत रडत राहतात किंवा रडवेली होतात. छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना रडायला येते.

8.    काहीजणांमध्ये पोटदुखी, अंगदुखी किंवा इतर शारिरीक लक्षणे सुरु होऊ शकतात. अशा लक्षणाला वैद्यकीय बेस नसतो व औषधाने बरे होत नाहीत.

9.    काही जणांमध्ये जेवण न करणे, झोप न लागणे किंवा जास्त जेवणे व झोपणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

    10. काही मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही किंवा ढासळते.

11. काही मुले सतत मोबाईल,लँपटाँप यावरती आपला जास्त वेळ घालवतात.

 

 

v या परिस्थितीला पालकांनी कसे हाताळायला हवे

1.    त्यांना बोलते करा- त्यांना बोलू द्या, प्रश्न विचारू द्या. त्यांच्या मनातील भीती काळजी याबद्दल त्यांना बोलू द्या. त्यांना व्यक्त होऊ द्या.

2.    त्यांचे ऐका- त्यांचे बोलणे व्यवस्थित लक्ष देऊन काळजी पूर्वक ऐका. त्यांचे म्हणणे, काळजी, भीती समजून घ्या.

3.    त्यांच्या बोलण्याला उडवून लाऊ नका. त्या विषयी निर्णायक भूमिका घेऊ नका. त्याच्याबद्दल त्यांना हसू नका, मजाक उडवू नका, रागाऊ नका.

4.    त्यांच्या भावना तुम्ही समजू शकता असे त्यांना सांगा. अशा परिस्थितीत काळजी, भीती वाटणे स्वाभाविक आहे परंतु आपण घाबरून न जाता सामना करायला हवा, हे त्यांना समजवून सांगा. तुम्ही नेहमी त्यांच्या सोबत असाल हे खात्रीने सांगा.

5.    कोरोना विषयी महत्वाच्या गोष्टी त्यांना समजवून सांगा परंतु जास्तीची माहिती पण देऊ नका.

6.    परीक्षाबद्दल व शाळेबद्दल जास्त काळजी करू नको, थोड्या दिवसात परिस्थिती सुधारली कि शाळा चालू होईल हे त्यांना सांगा. ऑनलाईन वर्ग व्यवस्थित अटेंड करायला व होमवर्क व्यवस्थिती पूर्ण करायला सांगा. त्यांना गरज असेल तर त्यांचा अभ्यास घ्या त्यांना समजवून सांगा.

7.    ज्यांना एकटेपणाची भीती वाटते किंवा आईवडिलांना जे चिकटून असतात त्यांच्यासोबत लपाछपी सारखे खेळ खेळा. बाहेर जाणार असाल तर त्याची कल्पना अगोदरच द्या. परत कधी येणार ते त्यांना सांगून ठेवा.

8.    त्यांचे एक व्यवस्थित वेळापत्रक बनवा ते त्यांना पाळायला सांगा व मदत करा.

9.    मुलांसोबत घरच्या सर्व कुटुंबियांचा स्क्रीन टाईम कमी व ठराविक ठेवा. त्याऐवजी एकमेकांसोबत वेळ घालवा. मुले मोबाईल, लॅपटॉप वर काय करतात यावर लक्ष ठेवा.  त्यांचा सोशल मिडीयावर भावनिक, मानसिक छळ होत नाहीये ना त्याचा कोणी गैरफायदा घेत नाहीये ना याबद्दल जागरूक रहा.

10.मुले आपल्याकडे बघूनच वागतात व शिकतात त्यामुळे आपले अनुकरण ते करणार हे गृहीत धरून वागा. स्वत: घाबरून जाऊ नका सकारात्मक रहा व चांगले वर्तन ठेवा.

11.टेक्नोलॉजीबाबत किंवा इतर काही गोष्टी मुलांकडून शिकायचा प्रयत्न करा त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

12.या वेळेचा कुटुंबामधील व मुलांसोबत बॉंडिंग वाढवण्यासाठी वापर करा.एकत्रित बैठे खेळ खेळा. एखादी अॅक्टीविटी  करा किंवा स्किल शिका.

13.अशा परिस्थितीत मुलांना तुमची, तुमच्या प्रेमाची व काळजीची व समजून घेण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वागा.

14.गरज असेल तर मनोविकारतज्ञाची मदत घ्या मनोविकारतज्ञाची मदत घ्यायला लाजू नका.वेळीच मदत घेतली तर कायमस्वरूपी मानसिक आघात व आजार होण्याची शक्यता येत नाही.

 

v इतर सर्वसाधारण परंतु महत्वाच्या गोष्टी

1.    रिलँक्सेशन टेकानिक – दीर्घ श्वास घ्या धरून ठेवा व हळूहळू सोडा पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा असे एकावेळी दहा वेळा सकाळी व रात्री करायाला सांगा.

2.    सोपे आसन व लहान मुलांचे व्यायाम करून घ्या व तुम्ही त्यांचासोबत करा.

3.    घरातील छोट्या छोट्या कामामध्ये त्यांना सामील करा. ते त्यांचाकडून करून घ्या.

4.    नातेवाईकांसोबत, त्यांच्या मित्रांसोबत विडिओ कॉल वरती संपर्कात रहायला सांगा.

5.    त्यांच्या व्यवस्थित जेवण, पुरेसे पाणी व्यायाम व झोप याकडे लक्ष द्या.    

      हा काळ सर्वांसाठीच कठिण आहे. अशा कठीण वेळेचा कसा सामना करायचा ते मुलांना शिकवण्याची चांगली वेळ आहे. चला त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यासाठी या वेळेचा उपयोग करून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी तयार करूयात.

 

डॉ अतुल ढगे                                                                             

मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ 

व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.            

माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी                    

Comments

Anant Fulsundar said…
Nice information, thank you Dr.

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness