‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’

 

*आई होणे एवढे सोपे असते का? प्रसूती नंतर कुठल्या मानसिक आजाराला आईला तोंड द्यावे लागू शकते? का काही आई स्वतःच्या बाळाला इजा पोहचवतात*.. *डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी* यांनी लिहिलेली ‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’  ..आपणही वाचा, दुसर्यांनाही पाठवा


 ‘गोष्टी मनाच्या भाग 4 – आई मी होणार’



“घरी एवढं आनंदाचे वातावरण आहे सगळे खुश आहेत. आम्हाला पहिली मुलगी हवी होती, मुलगी पण झाली. डिलिव्हरी व्यवस्थित झाली, मुलगी व्यवस्थित आहे. तिचे वजन व तब्येत व्यवस्थित आहे. मलाही काही त्रास नाही, कसले टेन्शन नाही; तरी पण मला खुश वाटतच नाही. सतत उदास वाटत राहते. निराश वाटत राहते. काही करावेसे वाटत नाही. कशात मन लागत नाही. झोपायला गेले तरी लवकर झोप लागत नाही, सकाळी ३-४ वाजताच जाग येते आणि परत जागेच राहावे लागते". निता मला सांगत होती.

     निता, २७ वय वर्ष, B. Com पूर्ण करून ऑफिस मध्ये जॉब करत होती. अडीच वर्षापूर्वी तिचे लग्नही झाले आणि दीड वर्षाने म्हणजेच १ महिन्यापूर्वी १ गोंडस मुलगी झाली. सर्व काही व्यवस्थित झाले कसलाही त्रास नव्हता. १ आठवडा चांगला गेला नी नंतर मग मात्र हे सुरु झाले. सुरुवातीला एक दोन आठवडे थोडीफार वाटणारी निराशा मात्र हळूहळू थोडी वाढतंच गेली. सुरुवातीला तिने कोणाला सांगितले नाही किंवा ते कोणाच्या ते लक्षातही आले नाही. नंतर मात्र तिचे खाणे कमी झाले, ती व्यवस्थित झोपतही नव्हती. तिच्या वागण्यावरून तिच्या माहेरच्या लोकांच्या लक्षात यायला लागले. तिच्या आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिची चिडचिड होत होती. आईला आधी वाटले मुलगी झाली म्हणून ती नाखुश असावी किंवा तिच्या सासरच्यांना मुलगा हवा असेल आणि मुलगी झाली म्हणून तिची चिडचिड होत असेल, उदास वाटत असेल. पण असे काहीही नव्हते. निताने आईला सांगितले "आई तसे काही नाही गं  उलट सर्व जण किती खुश आहेत मला आणि यांना दोघांनाही मुलगीच हवी होती. दोघांचीही आणि त्यांच्या आईवडिलांचीही हीच इच्छा होती कि पहिली मुलगीच व्हावी. आणि सगळं अगदी सर्वांच्या मनासारखे झालेय. मलाच कळत नाही असं का होतंय " मग दुसरं काही टेन्शन आहे का " आईने विचारले. " नाही गं असं काहीच नाही " निता रडत म्हणाली. हल्ली तिचे डोळे पाणावलेले असायचे मध्येच कधी कधी विनाकारण रडायला यायचे. एक वेळ स्त्रीरोगतज्ञाकडे दाखवून आणले त्यावेळी त्यांनी काही शारीरिक त्रास नाही असे सांगितले परंतु एक आठवडा उलटूनही त्रास कमी होत नसल्याने ते परत त्यांच्याकडे गेले. त्यांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या रक्त तपासण्या झाल्या परंतु सर्वकाही नॉर्मल होते. म्हणून स्त्रीरोगतज्ञांनी त्याने मनोविकारतज्ञाना भेटायला सांगितले. सुरुवातीला तिच्या आईवडिलांनी ते जास्त मनावर घेतले नाही. पण दोन दिवसांनी मात्र त्यांनी तिच्या मिस्टरांना फोन केला व सर्व सांगितले तिचे मिस्टर आले व ते सर्वजण तिला माझ्याकडे घेऊन आले.

              प्रथमच तिच्या घरच्यांनी सर्व काही सांगितले व नंतर डॉक्टरांनी निताशी बोलायला सुरुवात केली तेव्हा निताने वरील सर्व काही डॉक्टरांना सांगितले. "डॉक्टर मला आता वेड लागतंय कि काय असं वाटायला लागले आहे? मला वेड तर लागत नाहीय ना?

      नाही असे काही नाहीये" मी तिला सांगितले.  "मग मला स्त्रीरोगतज्ञानी तुमच्याकडे का पाठवले? मग मी तिला मनोविकारतज्ञ म्हणजे काही फक्त वेड्याच्या डॉक्टर नव्हे हे समजावून सांगितले. अजूनही ८०.७०% लोकांना ते समजवावे लागते व तिला तिच्या आजाराबद्दल थोड्या वेळाने सर्व काही सांगतो असे सांगून तिला काही प्रश्न विचारून गरजेनुसार माहिती घेतली. नंतर तिला बाहेर बसायला सांगून मिस्टरांना एकट्याना आत बोलावले व त्यांना तिच्या मूल होण्याच्या अगोदरच्या वागण्याबद्दल विचारले. "नाही डॉक्टर ती एकदम शांत आहे. म्हणजे जास्त एक्सायटेड नसली तरी अशी कुठल्या गोष्टीबद्दल उदास राहणे किंवा तसा तिचा स्वभावही नाही." 

    "पाळीच्या किंवा त्या दरम्यानच्या दिवसामध्ये तिचे वागणे कसे असायचे?" मी विचारले. नाही आता एवढे काही आठवत नाही फक्त थोडीफार चिडचिड व्हायची पण एवढे असे विशेष नाही काही जाणवले नाही" अमितने सांगितले.  घरी काही टेन्शन आहे का? दोघाचे जमते का? सासू-सुनेचे जमते का? इत्यादी गोष्टी मी त्यांना विचारल्या. तसा कोठेही काही प्रॉब्लेम नव्हता सगळं काही डिलिव्हरीच्यात (प्रसूतीच्या) ८ दिवसानंतर चालू झाले आहे हे क्लिअर झाले होते.

       मी निता व तिच्या घरच्याना सर्वाना आत बोलावले व सर्वाना तिच्या आजाराबद्दल माहिती द्यायला चालू केली. निताला प्रसूतीपश्चात नैराश्याचा आजार (Post-Partum Depression) झाले होते.

     मी त्यांना सांगितले "तसे घाबरण्यासारखे काही कारण नाहीये. हा मानसिक आजार आहे, परंतु म्हणजे वेडसरपणा नाही. याला आपण 'प्रसूतीपश्चात नैराश्याचा आजार’ (Post-Partum Depression) असे म्हणतो.  प्रसूती म्हणजे डिलिव्हरी, पश्चात म्हणजे नंतर, नैराश्य म्हणजे उदासिनता व आजार म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर होणारा नैराश्याचा किंवा उदासिनतेचा आजार. हा आजार साधारणतः डिलिव्हरीच्या १ आठवड्यांनतर सुरुवात होतो.”

       "पण डॉक्टर तिला तर कसले टेन्शन नाही तरी पण हे नैराश्य का?मिस्टरांनी आश्चर्याने विचारले.

      “तुम्हाला हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यासाठी प्रसूती प्रश्चात नैराश्याचा आजार का होतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. आपणा सर्वांच्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन असतात त्यामधील काही म्हणजे Oestrogen (स्त्रियत्वाचे हार्मोन)  progesterone  ही दोन हार्मोन स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. स्त्रियत्वाचे हार्मोनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला तर नैराश्य येण्याचे किंवा इतरही मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारण Oestrogen Progesterone या हार्मोनचा फार मोठा प्रभाव मेंदूवरती व त्याच्या कार्यावरती पडत असतो. जेव्हा केव्हा हा बदल मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हे मानसिक आजाराची शक्यता वाढते. स्त्रियांच्या आयुष्यात अशी वेळ बऱ्याच वेळी येते. ज्यावेळी मासिक पाळीची सुरुवात होते (Menarche) त्यावेळी, दर महिन्याला पाळी येते त्यावेळी किंवा पाळीच्या १४व्या दिवसाच्या आसपास (बीजांड फुटायच्या दरम्यान) किंवा मासिक पाळी बंद व्हायला लागते त्या वेळी ( Menopause) व प्रत्येक प्रसूतीच्या दरम्यान व गर्भधारणेच्या दरम्यान हे बदल खूप मोठ्या प्रमाणात होत असतात व त्यामुळेच या दरम्यान त्यासंबंधीत असे  मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. आता निताच्या बाबतीत हेच झालेले गर्भधारनेच्या दरम्यान एवढे दिवस जास्त प्रमाणामध्ये असलेले Progesteron अचानक प्रसूतीनंतर कमी झाले व त्यामुळे तिला हा त्रास व्हायला लागला.” मी त्यांना समजावायचा प्रयत्न केला.

         "म्हणजे सगळ्याच स्त्रियांना हो त्रास होतो का? मानसिक ताण तणाव नसतानाही हा त्रास होऊ शकतो का?  कारण माझ्या ३ डिलिव्हरी झाल्या पण मला कधी असा त्रास झाला नाही " निताच्या आईने विचारले.

     “नाही सगळ्यांनाच असा त्रास होतो असे नाही. जैविक घटक, मानसिक घटक, सामाजिक घटक अशा विविध कारणांमुळे हे आजार होऊ शकतात. मानसिक घटक म्हणजे जास्त काळजी करणारा किंवा सतत निगेटिव्ह विचार करणारा स्वभाव असेल, काही मानसिक ताण-तणाव असेल, काही मानसिक आघात झाला असेल किंवा लहानपणी काही समस्या हे कारणीभूत ठरू शकतात. तर सामाजिक घटक म्हणजे जर घरून मुलगाच व्हावा अशी अपेक्षा किंवा प्रेशर असेल तर, घरच्या व्यक्ती सपोर्टिव्ह किंवा केअरिंग नसतील, कामाच्या ठिकाणी काही त्रास असेल असे विविध सामाजिक घटक कारणीभूत ठरू शकतात. जैविक दृष्ट्या म्हणजे घरात कोणाला मानसिक आजार झालेला असेल तर, अनुवांशिकतेमुळे किंवा ज्यांचा हार्मोनमध्ये खूप मोठया प्रमाणात बदल होतात किंवा यापूर्वी  कधी मानसिक आजार झालेला असेल तर प्रसूतीननंतर नैराश्याचा आजार किंवा इतर मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्याची तीव्रताही प्रत्येकात वेगवेगळी असते. Post-Partum Blues नावाचा प्रकार असतो ज्यामधे हे फार थोड्या काळासाठी आणि थोडया प्रमाणात होते. काहीमध्ये ते झालं तरी ते बोलून दाखवत नाहीत किंवा ते इतरांना सांगत नाहीत. प्रसूतीपश्चात नैराश्याचा आजाराचे प्रमाण १०% - १५ % एवढे आहे. म्हणजे समजा जर १०० स्त्रियांच्या प्रसूती झाल्या तर त्यापैकी १० ते १५ स्त्रियांना प्रसूतीपश्चात नैराश्याच्या आजाराचा त्रास होतो. आपण समजतो त्या पेक्षा त्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे.” मी समजावायचा प्रयत्न केला.

“याची लक्षणे काय असतात? हे कसे ओळखायला पाहिजे? आम्हाला तिला आणायला जास्त उशीर तर नाही ना झाला? तिच्या पतीने विचारले.

      “या आजाराची लक्षणे साधारणतः प्रसूतीच्या नंतर १ आठवड्याने सुरु होतात. हळूहळू त्या व्यक्तीला खूप निराश वाटायला लागते. त्याची चिडचिड वाढते. त्याचे कशामध्येंही मन लागत नाही नी लक्षही लागत नाही, त्यागोष्टी करायला नको वाटतात किंवा पूर्वी त्यातून मिळणारा आनंद मिळत नाही. त्यांचे दैनंदिन काम, छंद आवडी यातला इंटरेस्ट कमी होतो. इतरांशी बोलायला वाटत नाही. एकटे एकटे व शांत बसायला लागतो. तिला भूक लागत नाही किंवा भूक लागली तरी जेवायची इच्छा होत नाही. झोपायला गेल्यानंतर झोप लागायला वेळ लागतो, मध्ये मध्ये जाग येते, शांत झोप येत नाही. सकाळी ३-४ वाजताच जाग येते व त्यांनतर झोप लागत नाही. दिवसभर फ्रेश वाटत नाही. जर वेळेत उपचार नाही झाला व तीव्रता वाढत गेली तर मग त्यांच्या मनात आत्महत्येचे  विचार देखील येऊ शकतात व रुग्ण तसा प्रयत्न देखील करू शकतो. प्रसूतीननंतर काही दिवसात आत्महत्या केलेच्या बातम्या आपण बऱ्याच वेळी ऐकतो. त्यामागे ‘प्रसूतीपश्चात नैराश्य’ किंवा ‘प्रसूतीपश्चात छिन्नमनसक्ता’ असण्याची शक्यता जास्त असते.” मी त्यांना समजावून सांगितले.

 “सर ‘प्रसूतीपश्चात छिन्नमनसक्ता’ म्हणजे काय?” अमितने लगेच विचारले. 

“आणखी एक मानसिक आजार असतो जो प्रसूतीपश्चात होऊ शकतो, तो म्हणजे प्रसूतीपश्चात छिन्नमनसक्ता. यामध्ये रुग्णाच्या वागण्यामध्ये बराच फरक येतो. तो मुख्यत: वेडसरपणा कडे झुकणारा असतो. यामध्ये रुग्णास व्यवस्थित कळत नाही. आपल्या व आजूबाजूच्या परिस्थितीचे ध्यान राहत नाही. ती विचित्रपणे वागू लागते. विचित्रचाळे करते. एकटी बसून बडबडणे, पुटपुटणे इत्यादी लक्षणें चालू होतात.

“सर मला तर असे होणार नाही ना?” नीताने अचानक घाबरून विचारले.

“नाही जास्त विचार नका करू. आपण वेळेत उपचार चालू केले आहेत. औषधोपचार व्यवस्थित घेतला आणि थोडीशी काळजी घेतली तर आहे तो पण त्रास पूर्ण कमी होईल.” मी तिची भीती ओळखून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

      “म्हणजे आता आम्ही काय काय काळजी घ्यायला हवी? सगळे ठीक तर होईल ना?” नीताच्या आईने काळजीच्या सुरात विचारले.

“हो सगळे ठीक होईल, तुम्ही लवकरात लवकर तिला दाखवण्यासाठी आणले आहे. फक्त थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे आहे म्हणजे औषधाचा कोर्स पूर्ण करणे. सर्वसाधारणपणे मानसिक आजार पहिल्या वेळेस झाल्यास त्यास ६ महिने ते ८ महिने कालावधीची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू ठेवणे गरजेचे असते. स्वतःच्या मनाने औषधे बंद किंवा कमी करू नका. दुसरे महत्वाचे म्हणजे तिचा मूड फ्रेश राहील याची काळजी घ्या. तिच्या मनावर जास्त ताण- तणाव येऊ देऊ नका. तिची होणारी चिडचिड समजून घ्या. तिला मानसिक आधार द्या. बाळ सांभाळायची जबाबदारी तिच्यावर न टाकता सर्वजण घ्या. बाळामुळे बऱ्याच वेळी झोप पूर्ण होत नाही, ती झोप पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा. जमलेच तर थोडासा वेळ स्वत:साठी, थोडासा व्यायाम करण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी काढायचा प्रयत्न करा. औषधाच्या मदतीने व तुमच्या आधाराने नक्कीच व लवकरच ते यातून बाहेर येतील.

      केबिन मध्ये आलेल्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर असलेली काळजी व भीती नक्कीच कमी झाली होती. औषधाचे प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांना 20 दिवसांनी परत दाखवण्यास सांगितले. व बेल वाजवून रेसेप्शनिस्टला पुढील पेशंटला आत पाठवायला सांगितले.

त्यानंतर 20 दिवसाने नीता व तिची आई फॉलो अप साथी आली तिच्यामध्ये 70% फरक पडला होता. कालांतराने ती पूर्णपणे ठीकही झाली व औषधोपचार पूर्ण झाल्यावर हळू हळू हळू कमी करून बंद ही झाली. परत मात्र त्यांना दाखवायला यायची कधी गरज पडली नाही.


*डॉ अतुल ढगेमेंदू-मनोविकारतज्ञलैंगिक समस्यातज्ञव्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटलरत्नागिरी*

Comments

Anant Varkate said…
Nice Info…. Keep it up… spread awareness through your more blogs!!!!

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness