कोरोना व सामाजिक कलंक
कोरोना व सामाजिक कलंक
कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून आपण मारहाणीच्या, द्वेषाच्या, सामाजिक दूजाभावाच्या अनेक बातम्या
वाचल्या, पाहिल्या, ऐकल्या. कोरोनासाठीच्या हॉस्पिटलमध्ये
काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस किंवा इतर कर्मचाऱ्यांना
सोसायटी मध्ये त्रास दिला गेला. त्यांना फ्लॅट सोडण्यास सांगण्यात आले. पुढे
काहीशी अशीच वर्तणूक पोलीस कर्मचारी, शिक्षक किंवा
इतर कर्मचाऱ्यांशीही झाली. त्यांच्याशी दूजाभाव ठेवण्यात येतो व त्रासदायक
वागण्याला त्यांना सामोरे जावे लागते. आणि हे सर्व होते, हा
सामाजिक कलंक आहे तो गैरसमजामुळे कि ते समाजासाठी धोकादायक आहेत. खरेतर तर ते
धोकादायक नसून ते समाजउपयोगी आहेत कारण अशा परिस्थिती मध्येही ते समाजासाठी सेवा
देत आहेत. खरंतर त्यांना सन्मान मिळायला हवे त्यांचे कौतुक करायला हवे. कोरोनाने
बाधित झालेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा जिथे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत अशा
सोसायटी किंवा क्षेत्र किंवा दुकाने यांचीही अवहेलना झाली.
खरेतर अशा लोकांना
सर्वांनी आधार द्यायला हवा. त्याचे मानसिक बळ वाढवायला हवे. परंतु असे होताना दिसत
नाही. रुग्ण बरा झाल्यावर देखील त्यांना वाळीत टाकणे. त्यांच्या दुकानात न जाणे, किंवा त्यांना आपल्या दुकानात न येऊ देणे, त्यांना पाणी नेण्यासाठी सार्वजनिक
ठिकाणी येऊ न देणे अशा घटना गावामध्ये सर्रास होताना दिसत आहेत.
या सर्वांचा वाईट परिणाम मात्र समाजाला व आपल्या सर्वांनाच भोगावा
लागतोय. हा सामाजिक कलंक आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून व्यक्ती त्रास झाला किंवा
लक्षणे दिसत असतील तरी ते लपवायचा प्रयत्न करत आहेत. ते टेस्ट करण्याचे किंवा
आरोग्य सेवा घेण्याचे टाळत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांचा आजार त्यांना त्रासदायक
झाल्यावरच कळत आहे. काही जणांना तोपर्यंत वेळ निघून गेल्यामुळे आपला जीव पण गमवावा
लागला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असे व्यक्ती आजार डिटेक्ट होईपर्यंत किंवा
लक्षणे नाहीच वाढली तर पूर्णवेळ समाजामध्ये तसाच वावरत आहेत आणि त्यामुळे ते
सुपरस्प्रेडर ठरत आहेत. इतर जणांना त्यांच्यामुळे कोरोनाची लागण होत आहे. ज्यामुळे
ही साथ आटोक्यात येण्याऐवजी वाढत आहे.
हा सामाजिक कलंक कमी
करण्यासाठी आपण सर्वांनी छोटी छोटी पावले उचलणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात आज
आणि आत्तापासूनच व्हायला हवी. आपण रुग्णाशी किंवा इतर व्यक्तीशी किंवा या विषयक
बोलताना शब्दांचा योग्य वापर करायला हवा. आपण जे शब्द वापरतोय ते हे कलंक वाढवत
नाही ना हे पहायला हवे. उदा. कोरोना महामारी ऐवजी कोरोनाची साथ, कोरोना पेशंट ऐवजी
कोरोनाचे इंन्फेक्शन झालेला पेशंट, कोरोना सस्पेक्ट
ऐवजी कोरोनाचे इंन्फेक्शन असू शकतो अशी व्यक्ती. असे बोलण्यात बदल आपल्याला करायला
हवेत. आपल्या बोलण्यातून हा आजार किती भयानक आहे, किती आणि कसे
लोक मरत आहेत किंवा याविषयींचे गैरसमज जे सोशल मीडिया वर पसरवले जात आहेत ते बोलू नका.
योग्य व खरी माहिती असू द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवू नका.
कोरोनाचा आजार व साथ किती भयानक आहे. याऐवजी कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येतो, कशी
व काय काळजी घ्यावी वेळीच उपचार घेतल्यावर लोक कसे बरे होत आहेत या बद्दल बोलावे.
बोलण्यात नेहमी सकारात्मकता असावी. समोरच्याला आपल्या बोलण्याचा आधार वाटावा असे बोलावे. सर्वांना
संवेदनशीलपणाने वागवावे. सदभावनेने वागावे. आपण सगळे सोबत आहोत. सगळे एकमेकांची
काळजी घेऊ अशा भावनेचे वातावरण आपल्या बाजूला निर्माण करावे.
व्हाटसअप्प, फेसबुक व इतर सोशल मीडियावर व कोरोना बद्दलच्या माहितीचा महापूर आला
आहे. कोरोनाच्या साथीपेक्षा कोरोनाविषयीच्या माहितीचा महापूर जास्त धोक्याचा ठरतो
आहे. ज्यामुळे हा मानसिक कलंक अजून जास्त वाढतो त्यामुळे आपण फक्त योग्य व
सकारात्मक व शास्त्रीयदृष्ट्या योग्य गोष्टीच शेअर करायला हव्या.
आपण जर या साथीमध्ये एकत्रपणाची भावना ठेवली व
त्यादृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन त्याच्याशी लढलो तर आपण लवकरच कोरोनाच्या साथीवर
विजय मिळवू शकू.
डॉ अतुल ढगे
मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती
तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.
माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
Comments