आज फिर जिने की तमन्ना है

 

आज फिर जीने की तमन्ना है

                                     डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी

                  



      या लेखात आपण स्वतःच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर काय करावे व परत आपल्या मनात विचार येऊ नयेत किंवा दूरदृष्टी ठेवून आत्महत्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे पाहूयात. आत्महत्येचे किंवा स्वतःला इजा करण्याचे विचार येणे स्वाभाविक आहे. ते सर्वांच्याच मनात कधी कधी येऊन जात असतात. त्यामुळे असे विचार येत असल्यास घाबरून जायला नको किंवा त्या बद्धल कमीपणाची भावना किंवा अपराधीपणाची भावना मनांत बाळगायला नको. हे दुर्बल असण्याचे लक्षण नाही. परंतु सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे आत्महत्येची कृती न करणे. अर्थात सतत मनात आत्महत्येचे विचार मनात येत असल्यास वेळीच मनोविकार तज्ञाची मदत घ्यायला हवी. आत्महत्येची कृती करण्याचे विचार मनात येत असल्यास व तीव्र इच्छा होत असल्यास त्यावेळी सर्वप्रथम आपल्याला तो क्षण टाळणे महत्वाचे असते. सर्वप्रथम मी स्वतःला इजा करणार नाही हे ठरवायला हवे, त्या किंवा तशा परिस्थीतीतून बाहेर पडायला हवे. नेहमी आपल्या नातेवाईकांच्या सोबत किंवा मित्रांसोबत राहावे, एकटे राहू नये. त्यासाठी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी भेटून बोलू शकतो, फोन करू शकतो, विडिओ कॉल करू शकतो. बोलल्याने तात्पुरते मन, शांत होऊ शकते. यासाठी आजकाल बऱ्याचशा हेल्पलाईन नंबरही मोफत मदतीसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण आसरा हेल्पलाइन ला ९८२०४६६७२६, हितगुज हेल्पलाइनला ०२२,२४१३१२१२, मैत्र हेल्पलाइनला ०२२२५३८५४४७ या नंबरवर फोन करू शकता.

              बऱ्याचवेळी हे विचार तात्पुरते असल्यामुळे आपण स्वतःला विचलित करण्यासाठी विविध गोष्टी करू शकतो जसे की मोटिवेशनल (प्रेरणादायी) गाणी ऐकणे, आपल्याला  खिळवून ठेवणारे सस्पेन्स किंवा प्रेरणादायी किंवा आपल्याला हसवणारे चित्रपट पाहणे. यु ट्युब वर प्रेरणादायी विडियो पाहणे किंवा पोडकास्ट ऐकणे. त्यासोबतच स्वतःला विचलित करण्यासाठी आपण ऑनलाईन गेम, विडियो गेम किंवा आपला आवडता मैदानी खेळ खेळू शकतो. आपल्या जवळच्या मित्राला फोन करून फिरायला जाऊ शकतो. आपले जुने फोटो पाहू शकतो. डायरी वाचू शकतो. स्वतःच्या अॅचिवमेंटचे चांगले क्षण आठवू शकतो किंवा त्याच्या आठवण करून देणाऱ्या गोष्टी पाहू शकतो. आपल्या आवडत्या खाण्याच्या गोष्टीवर ताव मारू शकतो. आपल्याला आवडणारी गोष्ट करू शकतो.

   अर्थातच हे तात्पुरते स्वतःला त्या विचारांपासून विचलित करण्यासाठी असते. यापैकी बऱ्याच गोष्टी त्यावेळी जमतीलच असे नाही परंतु कुठलीही एक गोष्ट करून स्वतःला विचलित करणे महत्वाचे असते. आत्महत्या करण्यासाठी वापरण्याजोगी वस्तू जसे की चाकू, बंदूक, झोपेच्या गोळ्या, फाशीसाठी वापरता येण्यासारखी दोरी, रॅटकिल, तणनाशक किंवा किटकनाशक किंवा इतर काही विषारी वस्तू स्वतःसोबत बाळगू नये.

  त्यानंतर मात्र लवकरात लवकर समुपदेशकाची किंवा मानसोपचारतज्ञाची व मनोविकारतज्ञाची भेट घ्यावी व योग्य ते उपचार करून घ्यावेत. त्यांनी सांगितल्या प्रमाणे उपचार पूर्ण करावेत. त्यासोबतच त्यानंतर परत आपल्याला मानसिक आजार होऊ नये किंवा मानसिकता ढासळू नये यासाठी चांगल्या मानसिकतेसाठी प्रयत्न करावेत. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, पुरेशी व वेळेवर झोप, ताण तणावाचे नियमन व समाजात मिसळणे या पंचसूत्रिचा वापर करावा. हे केल्यास सर्वांनाच याचा फायदा होऊ शकतो व आपण आत्महत्येपासून दूर राहू शकतो. कारण ही जीने की तमन्ना सर्वांमध्येच असते.


डॉ. अतुल ढगे
MBBS, DPM, MD(AM) 
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ

9503421124 
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems

 


Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness