मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ हरवला !

*मनाला लोकांपर्यंत नेणारा ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ हरवला !*

आज सकाळी डॉ. आनंद नाडकर्णी सरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते; ते मनाला समाजाशी जोडणारे विचारवंत, शिक्षक, लेखक आणि चळवळ उभी करणारे संवेदनशील कार्यकर्ते होते.

आमच्या पिढीतील अनेक मानसोपचारतज्ज्ञांसाठी ते मार्गदर्शक दीपस्तंभ होते. विशेषतः Community Psychiatry साठी. मानसिक आरोग्य क्लिनिकच्या चार भिंतीबाहेर कसे न्यावे, सामान्य माणसाला मनाची भाषा कशी समजावून सांगावी—हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. IPH च्या माध्यमातून त्यांनी साहित्य, संगीत, नाटक, कला आणि संवाद यांचा उपयोग करून मानसिक आरोग्य लोकाभिमुख केले. मानसिक आजारांबद्दल जागृती, उपचार आणि ताणतणावाशी सामना करण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण पद्धती या मला नेहमीच अचंबित करत. REBT सारखी किचकट वाटणारी उपचार थेरपी स्वतसाठी कशी वापरावी आणि रुग्णांसाठी त्याचा वापर कसा करावा व त्यांना ते कसे शिकवावे ही त्यांच्याकडून शिकायला मिळणे म्हणजे भाग्यच होते. 

त्यांनी मानसोपचाराला भीती, लाज आणि कलंकातून बाहेर काढून संवाद, समज आणि आशेच्या पातळीवर आणले. त्यांनी मनोविकरक्षेत्रात केलेले चौकटीबाहेर  केलेले प्रयोग कुठल्या जर्नल मध्ये नाही आले पण लोकांसाठी मात्र ते खूप उपयोगी ठरले. आणि समाजाच्या कसोटीवर ते चोख उतरले.

त्यांचे मराठी वाङमय बद्धल चा अभ्यास व त्याचा मानसोपचारामध्ये उपयोग वाखणण्यासारखा होता. त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकसाठी वापरलेले शुभंकर व शुभार्थी ही शब्द प्रचलित तर झालेच पण त्याने stigma कमी होण्यासही मदत झाली. त्यांच्याशी काही वेळा त्यांच्या घरी भेट झाली तेंव्हा त्यानी काढलेली चित्रे त्यानी आवर्जून दाखवली. ती दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लहान मुलासारखा असायचा. 

त्यांची पुस्तकेच त्यांच्या विचारांचा आरसा आहेत—‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’, ‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘मुक्तिपत्रे’, ‘विषाद योग’, ‘स्वभाव-विभाव’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘हेही दिवस जातील’… प्रत्येक पुस्तक मनाकडे पाहण्याची नवी नजर देते.

सर गेले, पण त्यांनी दाखवलेली वाट आमच्यासाठी अजूनही जिवंत आहे. मनाशी मैत्री करायला शिकवणारा हा शहाण्यांचा Psychiatrist अनेकांच्या मनात कायम राहील. त्यांचे पोर्ट्रेट पेंटिंग काढून त्यांना भेट द्यायची इच्छा होती. बऱ्याच दिवसापासून ती अर्धी बनवून झाली होती नी नंतर तशीच राहिली. आपण ती पोर्ट्रेट पेंटिंग वेळेत पूर्ण केली नाही आणि ती द्यायची राहिली  याचीही खंत  नेहमीच मनात राहील.

*डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ.*

Comments

Popular posts from this blog

*“मैदानावर हसत होती… पण मनात रोज लढत होती” – जेमिमा रॉड्रिग्सची खरी गोष्ट*

गेमिंग अॅडिक्शन : स्क्रीनच्या आड लपलेला गंभीर मानसिक धोका

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस