लैंगिक समस्या व अज्ञान


लैंगिक समस्या व अज्ञान
डॉ. अतुल  ढगेमनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ लैंगिक समस्या तज्ञ,

माईंडकेअर हॉस्पिटल रत्नागिरी यांनी लैंगिक आरोग्य दिनानिमित्त (४ सप्टेंबर) लिहिलेला लेख 


       लैंगिक वाचताच डोळे लेखाकडे नक्कीच वळले असतील आणि लेख वाचण्याची इच्छा नक्कीच झाली असेल, कारण हा विषयच असा आहे सर्वांच्या कुतूहलाचा पण खूप कमी वेळा चर्चा कलेला जाणारा आणि तोही एवढ्या उघडपणे ! कारण लैंगिकता म्हणजे लहानपणापासून श...श...श…याविषयी नसत बोलायचं”, लहानपणापासून हेच आपल्याला शिकवलेलं असत. अगदी UKG/LKG मध्येच बॉडी पार्टस शिकवले जातात.  हात,पाय, नाक,डोळे सर्व अवयवांची ओळख पुस्तकात असते, पण लैंगिक अवयवांची ओळख? मग एखाद्या लहान मुलाने कुतूहलापोटी विचारलं याला काय म्हणतात?......कि श.....श.....श....!!! हे सर्व शिकवलं जात ते १२ वी मध्ये, तेही विज्ञानात. किती लोक १२ वी पर्यंत शिकतात, त्यातले किती जण अभ्यास करतात अन त्यातले कितीजण यावर विचार करतात देव जाने !
       असो तर असा हा विषय आई वडिलांकडून,शिक्षकांकडून तरुण मुलामुलींना लैंगिक जीवनाबद्दल क्वचितच माहिती मिळते.जी माहिती मिळते ते सिनेमा, टीव्ही, रस्त्यावरील पुस्तके, कट्ट्यावरचे किस्से अन बढायांच्या गप्पांतून अन आजकाल मोबाईल मधील क्लिप्स मधून. कुतूहल वाढत जात नि मग माहिती मिळवली जाते ती चोरून....लपून.....अन वरील माध्यमातून. आणि माहिती मिळते ती अर्धवट व चुकीची ! समज पेक्षा गैरसमजच जास्त !! आणि मग इथून चालू होते ती लैंगिक समस्यांची वाटचाल !!!

       नंपुसकत्व, पहिल्या रात्रीचे गैरसमज, शीघ्रपतन,  स्वप्नावस्था, ह्स्थमैथून्य, स्त्रियांतील समस्या, मासिक पाळीच्या वेळी येणाऱ्या समस्या, चाळीशीनंतर येणाऱ्या लैंगिक समस्या किंवा संबंध राहूनही त्यातून न मिळणारा आनंद अशा अनेक समस्या आज खूप कॉमन आहेत. यातील बऱ्याचश्या समस्या मानसिक व शारीरिक असतात. ५०% समस्या या अज्ञानातून व गैरसमजातून निर्माण झालेल्या असतात. तसेच आजकालचे जीवन धकाधकीचे होत चालले आहे. त्यातून निर्माण होणारा तणाव यामुळे तर लैंगिक समस्या येतातच पण पती-पत्नीतील हरवलेला संवाद व वाढता विसंवाद, दारू, सिगारेट तंबाखू अशा व्यसनामुळे या समस्या निर्माण होतात व वाढत जातात. व हरवत जातो  वैवाहिक जीवनातला व लैंगिक जीवनातला आनंद. आणि मग त्यात मधुमेह व उच्चरक्तदाब असेल तर जास्तच प्रोब्लेम. प्रसुतीनंतर, मासिक पाळी बंद होताना स्त्रियांमध्ये किंवा चाळीस पन्नाशी नंतर पुरुषांत शरीरातील संप्रेरकातील बदलामुळे अनेक लैंगिक समस्या येतात. आणि लोकांना यावरचा उपाय एकाच वाटतो तो म्हणजे सेक्स टॉनिक. अज्ञान..... अज्ञान....... अज्ञान........हि अज्ञानाची गंगा समस्या तर निर्माण करतेच, पण ती इथेच थांबत नाही; कारण उपचार कुणाकडून करून घ्यायचा व काय उपचार असतो याबद्दलही अज्ञानच.
         सुरवातीला समस्या निर्माण झाली कि काय कराव हे न कळण्यातच सहा महिने जातात. मग नंतर ते बाजारात उपलब्ध असणारी तथाकथित सेक्स टॉनिक  (घोडा, बैल यांची चित्रे असलेली व ज्याच्या फायद्यापेक्षा अपायचं जास्त असतात) स्वतःच घेतात. किंवा टीव्ही वरुण जाहिरात पाहून किंवा पेपर वरती जाहिरात पाहून फोन वरती औषधे मागवतात तर काहीजण मेडिकल मधून ओवर द काऊंटर काहीतरी औषधे घेतात. काहीजण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तंबूच्या कडे जातात. तर काही पेपर मध्ये लॉजवरच्या तात्पुरत्या मुक्कामाला असणाऱ्या बिना डिग्री डॉक्टरांकडे जातात. कसलीही डिग्री नसते. कसलेही शिक्षण नसते, माहीर असतात  ते फक्त लोकांना मूर्ख बनवण्यात व त्यांच्या समस्यांचा फायदा घेण्यात. नस बंद हो गई है, करंट नही आता, लहानपणीच्या चुकांमुळे झाले असे सांगून त्यांच्या कडून  पैसे उकळून त्यांना औषधे म्हणून काहीहि दिले जाते, आणि विशेष म्हणजे त्यांच्या सर्व समस्यांवर एकच औषध (काय माहित तंबूच्या शेजारच्या झाडाचा पाला वळवून त्याचीच पावडर देत असतील). पेशंट ज्यावेळी माझ्याकडे येतात नि त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा खरच कीवही येते आणि हसायलाही. असाच एक किस्सा, ताठरता येत नाही म्हणून तो रुग्ण एका तंबूत गेलेला तेथे त्याने तपासणीसाठी म्हणून त्याला झोपवले. एक स्वीच चे कनेक्शन असलेला बल्ब त्याने घेतला, त्याने डोक्यावर ठेवला बल्ब लागला, छातीवर ठेवला लागला, पोटावर ठेवला लागला शेवटी त्याने लिंगावर ठेवला व स्वीच चालू केला नाही आणी म्हणाला “देखो भैया करंट नही आता नसें दब गई है”.

      
                                 खर तर लैंगिक समस्या अनेक प्रकारच्या आहेत. त्याची कारणेही वेगवेगळी असतात अन म्हणूनच त्याचे उपचारही वेगवेगळे असतात. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. लैगिक अवयव यांत शरीररचनाशास्त्रात तर या पूर्ण प्रक्रियेबद्दल, सम्प्रेराकांबद्दल शरीरशास्त्रात सखोल संशोधन झाले आहे. त्यामुळे लैंगिक समस्येचे नेमके कारण कळने सोपे झाले आहे. तसेच औषध निर्माण शास्त्राने विविध संशोधन करून सर्व प्रकारच्या आजारांवर औषधे तयार केली आहेत (तथाकथित सेक्स tonic नाही) तर लैंगिक समस्यातज्ञांनी विविध लैंगिक उपचार पद्धती उपलब्ध केल्या आहेत व या सर्व ज्ञानाच्या साह्याने या समस्या दूर करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता लैंगिक समस्येवर उपचार सोपे झाले आहेत. परंतु गरज आहे ती रचना, प्रक्रिया, औषधाच्या तसेच विविध लैंगिक उपचार पद्धतीच्या शिक्षण घेतलेल्या लैंगिक समस्या तज्ञाकडून उपचार घेण्याची. गैरसमाजातून निर्माण झालेल्या समस्या तर कमीत कमी औषध व पूर्ण लैंगिक शिक्षण व लैंगिक उपचार पद्धतीच्या सहयानेही दूर होऊ शकते. त्यामुळे आता या अज्ञानाच्या गंगेला ज्ञानाचा बांध घालून अडवणे आवश्यक आहे. अन्यथा यात आपले आनंदी वैवाहिक व लैंगिक जीवन वाहून गेल्याशिवाय राहणार नाही.
लैंगिक समस्येबद्दल आपण उहापोह केला. पण याबद्दल जरा व्यवस्थित समजल्याशिवाय किंवा माहिती दिल्याशिवाय लेख पूर्ण होणार नाही. आता आपण विविध लैंगिक समस्या कुठल्या असतात,  त्यामागची कारणे काय असू शकतात, कुठल्या तपासण्या कराव्या लागू शकतात व विविध उपचार पद्धती काय असतात हे पाहणार आहोत. प्रत्येक पुरुष / स्त्रियांमध्ये लैंगिक समस्या वेगवेगळ्या असतात. लैंगिक प्रक्रिया वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्यामुळे स्त्री व पुरुषांचे लैंगिक आजारही वेगवेगळे असतात.

पुरुषांमधील लैंगिक समस्या
१ नंपुसकत्व (Impotence)
२ अताठरता (Erectile dysfunction)
३ शीघ्रपतन (Premature ejaculation)

५ विलंबित वीर्यस्खलन (Retarded ejaculation)
६ धात सिंड्रोम (Dhat Syndrome)

८ स्वप्नदोष (Misconceptions about nocturnal Ejaculation/wet dreams)
९ संभोगाची भीती व अज्ञान ( Performance anxiety and problems due to lack of knowledge)


स्त्रियांमधील लैंगिक समस्या
१ कामउदासिनता (Frigidity) / लैंगिक अनिच्छा (Lack of desire)
२ योनिआकर्ष (Vaginismus )
३ कामपूर्तीचा अभाव (Anorgasmia)
४ संभोगाचे अज्ञान (problems due to lack of knowledge)
वेदनाकारक समागम (Dyspareunia)
६ राजोनिवृत्ती नंतरच्या लैंगिक समस्या ( Post-menopausal sexual problems)  
७ हस्तमैथुन्याची भीती (Misconceptions about masturbation)

कारणे:  
वरील प्रकारे आजार जसे वेगवेगळे आहेत तशी प्रत्येकाची कारणेही वेगवेगळी असतात. उपचार व्यवस्थित करण्यासाठी हे कारण कळणे  महत्वाचे असते. कारणे खालील पैकी असू शकतात.

मानसिक कारणे
  1.  कामक्रीडेविषयी अज्ञान,संकोच व भीती
  2.  बालपणातील कटू अनुभव
  3.  प्रेमाचा अभाव/वैवाहिक किंवा नाते संबंधातील समस्या
  4.  मानसिक तणाव व शारीरिक थकवा
  5.  मानसिक आजार-नैराश्य,काळजी,स्क्रीजोफेनिया इत्यादी

      
 शारीरिक कारणे
  1.  पिट्युटरी ग्रंथी किंवा वृषणाचा आजार
  2.  हार्मोनची कमतरता
  3.  मधुमेह,रक्तदाब,कॅन्सर,लिव्हरचे आजार इ. प्रदीर्घ आजार
  4.  अति मद्यपान, धुम्रपान, अति व्यसने
  5.  ज्ञानेंद्रियांचे आजार, चेतासंस्थेचे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार
  6.  स्थूलता
  7.  काही ठराविक आजारांसाठी वापरली जाणारी औषधे 


तपासणी 
उपचार करण्यासाठी योग्य निदान करणे गरजेचे असते. त्यामुळे कारण समजण्यासाठी व निदान करण्यासाठी मदतीला येतात त्या त्या तपासण्या, त्याबद्दलचे ज्ञान, वर्तन व समस्येबद्दलची पूर्ण माहिती
१ लैंगिकते बद्धलची पूर्ण माहिती
२ फिजीओलॉजिकल  टेस्ट
३ पूर्ण शारीरिक तपासणी
४ संप्रेरकांचे प्रमाण
५ थायारोईड
६ कलर डॉप्लर
७ पेपेव्हरीन इंजेक्शन टेस्ट
८ नोक्टर्नल पेनाईल ट्युमेसन्स अँड  रीजीडीटी (एन पी टी आर)
९ इ एम.जी(इलेक्ट्रोसायोग्राम)

उपचार पद्धती:
आपण पहिले कि आजार विविध प्रकारचे असतात व कारणे वेगवेगळी असतात. त्यानुसार उपचारही वेगवेगळे असतात. आजार व कारण काय आहे त्यानुसार उपचार ठरतात. यामुळे फक्त फोनवरून औषधें मागवून किंवा सेक्स टॉनिक घेऊन आजार बरे होत नाहीत तर लैंगिक समस्यातज्ञा कडून उपचार घेणे महत्वाचे असते.
  1.  सेक्सशुआलिटी कौन्सलिंग / लैंगिकता शिक्षण
  2.  सपोर्टीव्ह सायकोथेरपी / कॉग्नीटिव्ह बिहेवीअर थेरपी.
  3.  रॅशनल इमोटीव्ह बिहेविअर थेरपी.
  4.  औषधोपचार
  5.  आजारानुसार विविध सेक्स थेरपी.
  6.  पेपेवरीन इंजेक्शन.
  7.  व्हॅक्युम  पंप डिवाइस 
  8.  विविध ऑपरेशन
  9.  मशीन्स वापरून सेक्स स्टीम्युलेशन थेरीपी (MBT)

लक्षात ठेवा

१ सज्ञान व्हा / पूर्ण लैंगिक शिक्षण मिळावा. १० वयाच्या नंतर सर्वांनीलग्न करणार्यांनी लग्नापूर्वी,लैंगिक जीवन जगणाऱ्या सर्वांनी व समस्या असणार्यांनी लैंगिक शिक्षण घेणे आवश्यक असते. याने अनेक समस्या टाळता येतात. उपचारच नव्हे तर प्रतीबंधही करता येतो.

२ भिऊ नका,लाजू नकाआपल्या जोडीदाराशी मनमोकळी चर्चा करा.

३ लैंगिक तज्ञाकडे जाताना नेहमी दोघांनी जा कारण लैंगिक संबंध हि दोघांची प्रक्रिया आहे.

४. आपल्या आजाराबद्धल लैंकिगतज्ञाशी मनमोकळे पणाने चर्चा करा. लैंगिक आजार लपवून ठेवल्याने वाढत जातात तर वेळेत व योग्य उपचाराने बरे होऊ शकतात.
५. सर्वात महत्वाचे लैंगिक अवयव किंवा लैंगिक समस्या याबद्धहल आकस किंवा गूढपणा काढून टाका. जसे इतर अवयव व त्याच्या समस्या आहेत तसेच लैंगिक अवयव व समस्या. लैंगिक अवयव व समस्या बद्दल मनमोकळेपणाने बोला.


सर्वाना लैंगिक आरोग्य दिनानिमित्त (४ सप्टेंबर) चांगल्या लैंगिक आरोग्यसाठी शुभेच्छा.


डॉअतुल  ढगे
मनोविकारतज्ञव्यसनमुक्तीतज्ञ  लैंगिक समस्या तज्ञ


माईंडकेअर हॉस्पिटल रत्नागिरी


Dr. Atul Dhage

Neuro-Psychiatrist & Sexologist
Mindcare Hospital For Mental & Sexual health, Ratnagiri.

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness