लेख मालिका – गोष्टी मनाच्या भाग १ – सांग ना रे मना

 

            लेख मालिका – गोष्टी मनाच्या

         भाग १ – सांग ना रे मना / वेडे मन माझे



   


                                             डॉ अतुल ढगे(MBBS, DPM)

                                                     मेंदू-मनोविकारतज्ञलैंगिक समस्यातज्ञव्यसनमुक्ती तज्ञ  

                                     व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.

                                            माईंड केअर हॉस्पिटलरत्नागिरी

                                                          9503421124


     

         राहुल,  २५ वर्षाचा युवक व B.com Gratuate होता. तो एका कंपनीत क्लार्क म्हणून कार्यरत होता. अचानकपणे त्याच्या वागण्यामध्ये बदल दिसायला लागला होता, अचानकपणे तो शांत राहायला लागला होता. त्याचे बोलणे कमी झाले होते.  तो सतत स्वतःबद्दल, इतरांबद्दल व भविष्याबद्दल नकारात्मक विचार करायला लागला होता.  ते त्याच्या बोलण्यातून व वागण्यातून जाणवायला लागले होते. तो सतत उदास राहत होता. त्याची चिडचिड वाढली होती. त्याची भूक व झोप कमी झाली होती. त्याने जेवण कमी केले होते. रात्री तो झोप येत नसल्यामुळे अस्वस्थ होऊन फेऱ्या मारीत असे. कश्यामध्येही त्याचे मन रमत नसे. काही केल्या त्याला आनंद होत नसे. काही वेळा तो मरणाच्याही गोष्टी करत असे. ऑफीसमधल्या कामामध्येही त्याचे लक्ष लागत नव्हते, कामे व्यवस्थित होत नव्हती. काही वेळा तो कामावर जायचे टाळायचा, त्यामुळे त्याच्या आर्थिक बाबी वरतीही परिणाम व्हायला लागला होता. तो समाजात व नातेवाईकांशी राहणे व त्यांच्यासोबत बोलणे टाळायचा. घरी आई वडील व भावासोबत चिडचिड करायचा व त्यांच्यात भांडणाचे प्रमाण वाढले होते. सुरुवातीला त्याच्या घरच्यांना तो मुद्दाम असे वागतोय असे वाटले, पण मरणाच्या गोष्टी करायला लागल्यावर व इतर नातेवाईकांच्या सांगण्यावरून मात्र काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे काही तरी वेगळे आहे हे भावाला जाणवायला लागले. काहीजणांनी मनोविकार तज्ञाला दाखवण्याचा सल्ला दिला व भावाने त्याविषयी आई वडिलांशी चर्चा केली. वडिलांनी तो काय वेडा आहे का म्हणत दुर्लक्ष केले तर आईने काळजी पोटी उपचार करायची इच्छा असूनही,वेड्यांच्या डॉक्टरला दाखवल्यास लोक काय म्हणतील? आता त्याचे लग्नाचे वय, लग्न ठरायला प्रॉब्लेम  येतील; म्हणून तिनेही दुर्लक्ष केले. उलट ती अंगारे, धुपाटे करत बसली. दोन तीन वेळा ती त्याला गुरवाकडे घेऊन गेली. अर्थातच करणी उतरवून ही फायदा न झाल्यामुळे मग मात्र ते शेवटचा पर्याय म्हणून मेंदुविकार तज्ज्ञांकडे गेले. सुरुवातीला काही दिवस उपचार करून ही फायदा न झाल्याने व मेंदुविकार तज्ज्ञांच्या सल्ल्या वरुन मग मात्र ते नाईलाजाने त्याला मनोविकार तज्ञाकडे (त्यांच्या समजुती प्रमाणे वेड्यांच्या डॉक्टरकडे) म्हणजे माझ्याकडे घेऊन आले. १२-२० दिवसाच्या उपचारातच त्याच्यात फरक दिसायला लागला. १०-१५ दिवसात तो पूर्णपणे व्यवस्थित झाला व पूर्ववत कामावरतीही जावू लागला. मानसिक आजार झाल्यावरचा रमेश सारख्या अनेक लोकांचा हा प्रवास. अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा सामाजिक कलंक याने अवघड केलेला हा प्रवास. आज या अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा सामाजिक कलंक या मुळे कित्येक मानसिक आजारी लोकांना कित्येक दिवस त्रास सहन करावा लागतो किंवा रुग्ण स्वताच तो सहन करतो. काही दिवसापासून परिस्तिती बदलत आहे. लोक जागृत होत आहेत. मानसिक आजाराबद्धलचे कलंक कमी होतो आहे परंतु अजून खूप लांबचा पल्ला बाकी आहे. मन, मानसिक आजार, त्याची लक्षणे व इतर माहिती घेतली तर त्याचा फायदा आपल्याला, आपल्या नातेवाईकाला किंवा समाजाला नक्कीच होऊ शकतो.

                             असो पुढे काही दिवसांनी रमेश व सोबत त्याचा भाऊ फॉलो अप साठी आला. त्यावेळी मी त्याला, त्याला झालेला त्रास, ती लक्षणे कुठल्या आजाराची आहेत. पुढे काय काय काळजी घ्यायला हवी हे सांगितले. “मला वेड तर लागले नव्हते ना”? रमेश ने विचारले. मी त्याला सांगितले “नाही हा वेडसरपणा नाही, हा नैराश्य नावाचा दूसरा मानसिक आजार आहे. प्रत्येक मानसिक आजार हा वेडसरपणा नसतो”.  “मानसिक आजार म्हणजे नेमके काय”? रमेश ने प्रश्न केला. “भावना, विचार, वर्तन आणि बोलणे याचा समतोल ढासळणे व त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या मनाला किंवा इतरांना त्याच्यामुळे त्रास होणे”. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते. कदाचित त्याला ते समजले नसावे म्हणून मी पुढे म्हणलो “म्हणजे मानसिक आजार हे भावना, विचार, वर्तन आणि बोलणे यात होणाऱ्या बदलांचा आजार आहे. जेंव्हा आपल्या विचारामध्ये बदल होतो, आपल्याला वाटणाऱ्या भावनेमध्ये बदल होतो व विचारातील व भावनेतील या बदलामुळे त्याच्या बोलण्यावरती व वागण्यावरती फरक जाणवतो व त्याचा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व्यवहारिक व नातेसंबंध यापैकी एका किंवा सर्व गोष्टीवरती परिणाम करतो. बऱ्याच वेळी तो फरक त्याच्या आसपासच्या लोकांना, नेहमी सानिध्यातल्या लोकाना दिसून येतो. बऱ्याच वेळी त्याचे वागणे, बोलणे, विचार करण्याची पद्धत विचित्र असेल तर ते लगेच लक्षात येते. हा बदल एकदम होऊ शकतो किंवा हळूहळू ही होऊ शकतो. थोडकयात हा मनाचा आजार आहे मनाशी निगडीत गोष्टीमध्ये या मूळे समस्या निर्माण होतात व त्याचा रुग्णाला व नंतर नंतर सर्वांनाच त्रास होऊ शकतो. 

   “पण सर मन म्हणजे नेमक काय? आणि हे मन किंवा मानसिक आजार कसं समजते”? रमेशच्या भावाच्या मनात ही आता कुतूहल निर्माण झाले होते.  मला बऱ्याच रुग्णाकडून, नातेवाईकाकडून किंवा कार्यक्रमात प्रेक्षकाकडून विचारला जाणारा हा प्रश्न. “थोडक्यात सांगायचे झाले तर मेंदू हे हार्डवेअर आहे जे दिसू शकते, तर मन हे सॉफ्टवेअर आहे जे दिसत नाही पण त्याच्या कार्यावरून ते फक्त आपल्याला समजून घ्यावे लागते. मन म्हणजे आपल्या विचारावरून, वागण्यावरून, बोलण्यावरून, भावनेवरून आपल्याला समजू शकते. आपल्या मेंदूची रचना, त्यातील मज्जातंतू व त्याचे जाळे ज्याला आपण न्यूरोन्स न्यूरोनल कनेक्शन  म्हणतो व त्यातील न्यूरोट्रान्समिटर ( केमिकल्स) यावरून आपले मन कसे काम करते / कसे आहे हे अवलंबून असते”. मी सांगितले. मनाबद्धल सर्वांच्याच मनात खूप कुतूहल असत. खर सांगायच तर गूढता किंवा अज्ञानच असते. 

       मन आणि मानसिक आरोग्य याकडे आपण अजूनही दुर्लक्ष करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येप्रमाणे मानसिक आरोग्य व आध्यात्मिक आरोग्य हा एक आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. आणि या दोन्ही गोष्टी मनाशी संबंधित आहेत. आणि मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नसणे नव्हे तर आपले मन चांगले असणे किंवा राखणे याचाही समावेश होतो. यामध्ये मुख्यत: आपल्या भावना, विचार, वर्तन आणि बोलणे याचा समतोल राखणे व स्वतःच्या व इतरांच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग करणे म्हणजे मानसिक आरोग्य होय. तर आध्यात्मिक आरोग्य म्हणजे फक्त पूजा पाठ, भजन, अंधश्रद्धा नव्हे तर स्वतच्या पुढे जाऊन समाजाला मदत करणे, व्यक्तींना मदत करणे, समजून घेणे, दया, करूणा, शांती इत्यादि भावना व विचार आत्मसात करणे व त्यापद्धतीने वागणे होय. वाढती धावपळ, स्पर्धेचे जग, भौतिक सुखाची अपेक्षा व त्यासाठी लागणारे प्रयत्न यातील फरक व त्यातून होणारे अपेक्षाभंग, समाजातील बदलती मानसिकता या सर्व गोष्टीमुळे मानसिक आरोग्य टिकवणे अवघड जात आहे. ताण-तणाव, ते सहन न होणे यातून मानसिक आजार वाढत चालले आहेत. परंतु हे जरी असले तरी २०-३० टक्के मानसिक संतुलन व्यवस्थित राखत आहेत. तर ५ ते १० टक्के लोक आपल्या ताण तणावाशी लढण्याची क्षमता वाढवून स्वयंविकास करत आहेत किंवा स्वताला आध्यात्मिक पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी होत आहेत. परंतु त्यांची संख्या अगदीच नगण्य आहेत. तर जास्तीत जास्त लोक ताण तणावामुळे व इतर काही जैविक कारणामुळे मानसिक आजाराची शिकार होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या २००१ च्या एका अहवाला प्रमाणे ५ पैकी १ व्यक्तीला आयुष्यात कधी न कधी एक वेळा मानसिक आजार होतो असे म्हटले आहे.

            “पण मग सर एखाद्याला मानसिक आजार झाला आहे हे आपण कसे ओळखू शकतो”? रमेशच्या भावाने पुनः विचारले.  मी म्हणालो, “आधी सांगितल्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या किंवा स्वतःच्या भावना, विचार, वर्तन आणि बोलणे याच्यामध्ये अचानक किंवा हळूहळू बदल झाल्यास व त्याचा त्या व्यक्तीस किंवा इतरांस त्रास होत असल्यास किंवा त्याचा त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आर्थिक किंवा सामाजिक दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होत असल्यास त्यास मानसिक आजार झाला आहे असे समजावे. हे बदल व्यक्ती सापेक्ष असू शकतात व व्यक्तीनुसार बदलू शकतात. मेंदूत झालेल्या केमिकल मधील किंवा मेंदू मधील इतर काही बदलांमुळे त्याच्या मना वरती काही बदल होतोय व मग ते विविध बदलाप्रमाणे  ती लक्षणे वेग वेगळी असू शकतात हे आपण समजून घ्यायला हवे”

 म्हणजे मानसिक आजार हा मेंदुच्याच आजाराचा प्रकार आहे का”? रमेश ने विचारले.

होय. मन किंवा मानसिकता हे मेंदूचेच कार्य आहे मेंदूत होणारे बदल किंवा मुख्यतः मेंदूच्या न्यूरोट्रान्समिटर मध्ये होणारे बदल यामुळे मनाच्या किंवा मानसिकतेच्या कार्यावरती होणारा बदल म्हणजेच मनाचे आजार किंवा मानसिक आजार होय”. मी त्याला सांगीतले.  मग मी मेंदूरोग तज्ञास दाखवले  होते तरी का फरक नाही पडला. मी मेंदूरोगतज्ञाला दाखवायला हवे की मनोविकारतज्ञाला दाखवायला हवे? रमेश ने प्रतिप्रश्न केला. मी म्हणालो “आपण यात सर्वात पाहिल्या प्रमाणेच संबंध लाऊयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपे होईल. मेंदूरोगतज्ञ (Neurologist) म्हणजे हार्डवेअर इंजिनिअर तर मनोविकारतज्ञ किंवा मानसोपचारतज्ञ म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर असे आपण समजू शकतो. मेंदुमध्ये प्रत्यक्ष होणारे बदल व त्याचा शरिरावर होणारा परिणाम या आजारांचा उपचार मेंदूविकारतज्ञ करतात. तर मेंदुमध्ये होणारे अप्रत्यक्ष बदल व त्याचा त्याच्या कार्यावरती म्हणजे मनावरती (म्हणजे पर्यायाने विचार, भावना, वर्तन व बोलणे) यातील बदलामुळे व्यक्तीच्या किंवा इतरांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या आजारांचा उपचार मनोविकारतज्ञ / मानसोपचारतज्ञ करतात. औषधोपचाराच्या माध्यमातून व संवादाच्या माध्यमातून त्या सॉफ्टवेअर मध्ये आलेला वायरस ते काढून टाकतात. एवढेच नाही तर योग्य मनोविकरतज्ञ भेटला तर त्यांच्या मदतीने स्वयं विकासासाठी, यशासाठी योग्य व नवीन सॉफ्टवेअर पण आपल्या मेंदूत इंस्टॉल करू शकतात.” मी हसत हसत म्हणलो. काही दिवसापूर्वी नैराश्याच्या आजारामुळे हसायला विसरलेला रमेश च्या चेहऱ्यावरही हास्य उमटले होते. उपचारानंतर प्रत्येक रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आनंद व त्यांचा त्रास कमी झाल्याची पावती असते व मला समाधान व पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट पण असते. आणि विशेष मध्ये इथे फक्त रुग्णाचाच नाही तर त्यांच्या घरच्यांचाही त्रास कमी झालेला असतो. कारण शारिरीक आजार असेल तर फक्त रुग्णाला त्रास होतो पण जर मानसिक आजार असेल तर रुग्णा सोबत त्याच्या घरच्या सर्व व्यक्तींना पण त्रास होत असतो. सर्व कुटुंब त्यामुळे डिस्टर्ब असते.      

         “मग मनोविकारतज्ञ व मानसशास्त्रज्ञ समुपदेशक यामध्ये काय फरक असतो”? रमेश च्या भावाने विचारले. कदाचित त्याला या विषयाबद्धल थोडी माहिती असावी किंवा वाचन असावे.  मनोविकारतज्ञ हे डॉक्टर असतात ज्यांनी MBBS केल्यानंतर मनोविकृती या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असते. ते मानसिक आजाराच्या उपचारासाठी औषधोपचार, विद्यूत उपचार व समुपदेशन ( कौंसेलिंग) याचा वापर करतात. मानसशास्त्रज्ञ हे मानसशास्त्रातील BA पदवीधारक किंवा मानसशास्त्रात पदव्युत्तर MA झालेले असतात. मानसिक आजाराच्या उपचारात ते समुपदेशन (कौंसेलिंग) किंवा विविध मानसोपचार पद्धतीचा (Psychotherapies) याचा वापर करतात. काही ठिकाणी मानसशास्त्रज्ञ अनधिकृतपणे औषधेही सांगतात किंवा prescribe करतात. जे पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे औषधे घेताना MBBS / MD/ DPM पदवीधारक डॉक्टर आहेत की doctorate वाले डॉक्टर आहेत हेही पाहणे नक्की गरजेचे आहे. सौम्य स्वरूपाच्या मानसिक आजारामध्ये बऱ्याच वेळा तसेच मध्यम व तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये औषधोपचाराने रुग्ण बरा होत आल्यावर कौंसेलिंग (समुपदेशन) मानसोपचार पद्धतीचा वापर केला जातो. मध्यम व तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारामध्ये औषधोपचार हा खूप महत्वाचा असतो. वेडसरपणा(psychosis) या गटातील आजारामध्ये मात्र सौम्य स्वरूपाच्या आजारामध्येही औषधोपचारच महत्वाचा असतो. समुपदेशक हा कोणीही असू शकतो. समुपदेशन करणारी प्रत्येक व्यक्ति समुपदेशक असते. मग ती व्यक्ति मनोविकारतज्ञ असू शकते, किंवा मानसशास्त्रज्ञ असू शकते किंवा इतर कोणीही.” हा प्रश्न पडणाऱ्या बऱ्याच जणांसाठी हे माझे सर्वसाधारण उत्तर असते.

  “सर मी बाहेर वेटिंग रूम मध्ये मनोविकास लिहलेले वाचले. मनोविकास म्हणजे काय? रमेश ने विचारले.  मनोविकास म्हणजे मानसशास्त्रातील विविध सिद्धांत व गोष्टी वापरून मानसिक आरोग्य मिळवणे व राखायला शिकणे. विचार, भावना बोलणे व वर्तन यात समतोल राखायला शिकणे व त्याचा आपल्या स्वतःच्या विकासासाठी समृद्धीसाठी वापर करणे म्हणजे मनोविकास. मनोविकासाच्या साहाय्याने विद्यार्थी आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. आपण आपल्या भीतीवरती मात करू शकतो, लोकांपुढे/ लोकांसोबत काय व कसे बोलावे, कसे वागावे, चांगल्या सवयी कशा लावाव्या, इतर गोष्टी शिकून स्वतः वैयक्तिक, आर्थिक व पर्यायाने सामाजिक दृष्ट्या प्रगत होऊ शकतो. इतरांनाही त्यासाठी मदत करू शकतो.” मी म्हणालो.  प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मनोविकासासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे ठरते आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी व या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व पुढे जाण्यासाठी मनोविकास खूप महत्वाचा ठरत आहे.

            रमेश व त्याच्या भावाला जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन शंकानिरसन झाले होते. तेवढ्यात रीसेप्शनिस्ट ने आत येऊन विचारले, “ सर पेशंट विचारात आहेत किती वेळ लागेल त्यांना आज लवकर परत जायचे आहे.” रमेश च्या लक्षात आले बराच वेळ गेला आहे. “सॉरी सर तुमचा खूप वेळ घेतला, निघतो आम्ही”. आणि ते दोघे समाधानाने ओपीडी मधून बाहेर पडले.                                                क्रमश:



                                                डॉ अतुल ढगे(MBBS, DPM 

                                                      मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ  

                                       व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.

                                            माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी

                                                          9503421124

Comments

Unknown said…
Khup chhan describe kela aahe 🙂
Unknown said…
Khup cchan mahiti

Popular posts from this blog

*“मैदानावर हसत होती… पण मनात रोज लढत होती” – जेमिमा रॉड्रिग्सची खरी गोष्ट*

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ