डॉक्टर आमच चुकलच...

 

डॉक्टर आमच चुकलच...

                         डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल



                        “डॉक्टर आम्ही तुमचे ऐकायला पाहिजे होते.” समोरची व्यक्ती बोलता बोलता थांबली आणि हुंदके देऊ लागली. मीही स्तब्ध झालो. तसे अनेक रुग्ण नेहमी पाहत असल्यामुळे नेमके कोण बोलत आहे आणि नेमका संदर्भ काय असावा हे कळणे शक्य नव्हते. मागील काही दिवसातील रुग्ण डोळ्यासमोरून गेले परंतु अंदाज येत नव्हता. मी त्यांना शांत होण्यासाठी वेळ द्यावा म्हणून म्हटले  “टेक युअर टाईम, तुम्हाला कम्फरटेबल वाटेल तेव्हा बोला”. मी कॉल चालू ठेवला व डोक्यात विचारही चालूच होता. काय झाले असावे व कुठल्या रुग्णाबाबत असावे याचा विचार करत होतो. अंदाज येत नव्हता पण काहीतरी खूप सिरियस आहे. याचा अंदाज आला होता. समोरची व्यक्ती शांत झाली होती. डॉक्टर मी समीर (नाव बदललेले) चा बाबा बोलतोय. समीर ने परवा फास लावून घेऊन आत्महत्या केली. आणि ते परत रडायला लागले. माझ्याही पायाखालची जमीन सरकली आणि आता मात्र माझ्या सगळे लक्षात आले. आणि आठवड्यापूर्वीचा प्रसंग आठवला.

     समीर, अवघ्या २७ वर्षाचा होता. व्यवसायात व्यवस्थित स्थिर होता.  ६ महिन्यापूर्वी त्याचे ब्रेक अप झाले होते. तो एकटा राहायला लागला होता, चिडचिडा झाला होता. पूर्वी दारू पित असला तरी दारू पिण्याचे प्रमाण आठवडा महिन्यातून एकदा वरून दररोज १-२ वेळा वर आले होते. व्यसनमुक्तीसाठी म्हणून त्याचे वडील आई घेऊन आले होते. त्याच्याशी बोलल्यावर व्यसनापेक्षा जास्त सिरियस डिप्रेशन असल्याचे लक्षात आले होते. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याने व ते सिरीयस असल्याने मी त्याच्या घरच्यांना अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी फोन करून इतर घरच्या लोकांशी डिस्कस केले व गोळ्या लिहून देण्यास सांगितले. डॉक्टर आम्ही त्याला कधीचे सांगतोय तू त्या मुलीला विसर, पण हा ऐकायलाच तयार नाही. तेवढी एक गोष्ट त्याला सांगा व समजवा. बाकी व्यवसाय चांगला आहे, घरी काही कमी नाही, टेन्शन नाही. फक्त त्याच टेन्शनमुळे तो दारू पितोय.

     खरं म्हणजे समजवायची गरज याक्षणी त्याच्या बाबाला होती. मी त्यांना त्याच्या आजाराचे स्वरूप, सध्याचा सिरीयसनेस समजाऊन सांगून ही मनोविकार शास्त्रातील इमर्जन्सी आहे. जसे शारिरीक आजारात अटॅक आला तर फक्त गोळी देऊन चालत नाही तर अॅडमिट करून उपचार करावे लागतात, तसे ही मनोविकार शास्त्रातील इमर्जन्सी आहे व अॅडमिट करून उपचार करणे गरजेचे आहे सांगितले. मात्र त्याचे काका तयार नाहीत, लोक काय म्हणतील आणि इतर कारणांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला.

     मग मात्र मी गोळ्या लिहून दिल्या व काय काय काळजी घ्यायला हवी ते समजवून सांगितले होते. व ते गोळ्या घेऊन गेले होते.

     त्या एकदोन मिनिटात हे सर्व माझ्या डोळ्यासमोरून एका चित्रफितीप्रमाणे निघून गेले. “आम्ही तुमचे त्या दिवशी ऐकले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती”. त्यांच्या बोलण्याने मी भानावर आलो. मी त्यांचे बोलणे ऐकून घेतले व सांत्वन करून फोन ठेवला. मुळातच उपचाराबाबत अनेक गैरसमज  असल्यामुळे उपचार घेण्यात दिरंगाई होते, त्यात सामजिक कलंक यामुळे अजूनच अडचणी येतात. हृदयविकाराचा झटका, अॅक्सिडेंट, अर्धांगवायुचा झटका, शुगर किंवा बी.पी.  वाढणे असे काही आजार झाले की आपण लगेच अॅडमिट करतो तसेच मनोविकारामध्ये आत्महत्येचे विचार व प्रयत्न, स्वत:ला इजा करणे, इतरांना इजा करणे औषधोपचार न घेणे, नुकसान करणे, जेवण न करणे, स्वत:कडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशा गोष्टींना इमर्जन्सी समजले जाते व अॅडमिट करून उपचार करावे लागतात. गरज असेल तर विद्युत उपचार (shock treatment) चा वापर करावा लागतो.

     ज्यावेळी कधी पेपर मध्ये रत्नागिरी परिसरातील आत्महत्येची बातमी वाचतो त्यावेळी विचार येतो हा माझा पेशंट नसेल ना? कारण औषधोपचारामुळे आत्महत्येचा धोका टळत असला तरी काही वेळा औषधोपचार बंद केल्यामुळे, डोस व्यवस्थित न गेल्यामुळे किंवा आजार जास्तीचा झाल्यामुळे रुग्ण आत्महत्या करू शकतो. लोकांना वाटत असते की परिस्थितीमुळे आत्महत्या केली, परंतु तसे नसुन आत्महत्या करणारे ९० % रुग्ण हे मानसिक आजाराने ग्रस्त असतात जे औषधोपचाराने थांबवता येऊ शकते.

     आजही जेव्हा रुग्णाला अॅडमिशन ची गरज असते व त्याला किंवा नातेवाईकाला समजवून सांगितल्यानंतरही ते अॅडमिट करत नाहीत त्यावेळी ते जाताना एकच विचार मनात येतो ........ "याचा समीर तर होणार नाही ना”?


डॉ अतुल ढगे

MBBS, DPM, MD(AM) 

मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ

माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ

9503421124 

#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems,

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness