आता समर्थ मी
आता
‘समर्थ’ मी
डॉ अतुल ढगे, माईंड
केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
“आता तो कुठेही बाहेर जायला मागत नाही. आधी मामाच्या
गावाला जायचे म्हटले की एक महिना अगोदर तयारी चालू व्हायची.
आता जाऊयात का विचारले तरीही चिडचिड करतो” समर्थ ची आई सांगत
होती.
समर्थ (नाव बदललेले) नऊ वर्षाचा होता. मागील चार महिन्यांपासून त्याला
रात्री अंथरुणात शु होण्याचा त्रास चालू झाला होता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा
तरी त्याला हा प्रॉब्लेम नक्की यायचा. आठ महिन्याच्या छोट्या आदितीला सांभाळतानाच
समर्थच्या या उद्भवलेल्या समस्येमुळे त्याच्या आईची चिडचिड व्हायची. काहीवेळा ती
त्याला शिक्षाही करायची. परंतु ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतच होती. त्याचा
आत्मविश्वास कमी होत चालला होता. आईने एकदा तुझ्या मित्रांना सांगते ते तुला
चिडवतील म्हटल्या पासून त्याने मित्रात जायचे बंद केले होते. नातेवाईकाकडे शू झाली
तर सर्वांना कळेल म्हणून त्याने नातेवाइकांकडे जाणेही बंद केले होते. माझ्या
दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून या समस्येसाठी त्याची आई
माझ्याकडे उपचारासाठी घेऊन आली होती.
बऱ्याच वेळी मुलांना कपड्यांमध्ये
किंवा बिछान्यामधे शु करण्याचा त्रास होतो. वयाच्या पाच वर्षानंतरही मुलं बिछाना
ओला करत असेल तर त्याला समस्या समजले जाते. काहींना पाच वर्षानंतरही शु कंट्रोल करता येतच नाही तर काही जणांचा कंट्रोल आल्यानंतर
काही वर्षाने काही गोष्टीमुळे शु वरचा कंट्रोल निघून जातो.
जर मुल कुठल्यातरी कारणामुळे निराश असेल जसे की घरात नवीन बाळाचे आगमन व मग
त्याकडे जास्त लक्ष होऊन याच्याकडे दुर्लक्ष होणे, कुटुंबात होणारी भांडणे, शाळेमध्ये किंवा अभ्यासामध्ये किंवा मित्रांमध्ये
जमवून घ्यायला काही समस्या निर्माण होणे ही काही मानसिक कारणे असू शकतात. त्यासोबतच
क्वचितच काही जणांमध्ये मूत्रमार्गाला झालेल्या संसर्गामुळे,
त्याच्यावर/तिच्यावर होणाऱ्या लैंगिक
अत्याचारामुळे, मूत्र मार्गातील शरीररचनेच्या किंवा त्यांना कंट्रोल करणाऱ्या
मज्जातंतू किंवा मेंदूच्या भागाच्या समस्या तसेच लहानपणी होणारा मधुमेह (जुवेनाईल
डायबिटीस) अशी काही कारणे असू शकतात. जर मुल दिवसा शाळेमध्ये कपडे ओले करत असेल तर
त्या मागे शाळेतील काही समस्या, शाळेतील अस्वच्छ स्वचछतागृहांमुळे ते वापरावेसे न
वाटणे ही कारणे असू शकतात.
जास्त खेळल्यामध्ये केंव्हातरी
मुल बिछाना ओले करत असेल तर काही काळजीचे कारण नसते, पण ५ वर्ष वयाच्या नंतरही
आठवड्यातून २ वेळा पेक्षा जास्त किंवा महिन्यातून १० वेळा पेक्षा जास्त वेळा असे
तीन महिने चालू राहिल्यास हा आजार आहे हे समजून घ्यायला हवे. बऱ्याच वेळी आपले मूल
मतीमंद आहे की काय अशी भिती पालकांना वाटु शकते. एखादे मूल फक्त लघवीवर नियंत्रण
करायला उशीर लागतो म्हणून मतीमंद ठरत नाही. पालकांनी या समस्येसाठी मुलाला दोष
देणे, मूल आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम करतोय असा
विचार करणे किंवा बोलणे, त्यासाठी त्याला शिक्षा करणे
पूर्णपणे टाळायला हवे. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकतात.
या आजारामध्ये औषधोपचारासोबतच पालकांचे समुपदेशन व मुलांसाठी बिहेवीअरल
थेरपी (वर्तणुक उपचार) हे खूप महत्वाचे आहे. पालकांनी या गोष्टीला धीराने सामोरे
गेल्यास व योग्य वेळी उपचार केल्यास यातुन मुल लवकरात लवकर बाहेर पडू शकते.
अर्थातच समर्थच्या बाबतीतही हेच झाले हे वेगळे सांगायला नको. उपचारानंतर
समर्थ आता ठीक आहे व स्वतःच्या शुवरती कंट्रोल ठेवण्यास समर्थ' आहे.
MBBS, DPM, MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
#mentalillness,
#mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems,
#deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems
Comments