ढ...ढ...ढ...मुलाचा
ढ... ढ...
ढ मुलाचा
डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
"अभ्यास करायचा नेहमी कंटाळा करतो.
अभ्यासाला बस म्हटले की याचे कांगावे सुरू होतात. वाचूनही काही लक्षात राहत नाही.
पुढचे पाठ मागचे सपाट अशी परिस्थिती आहे. आम्ही दोघेही पदवीधर आहोत तरीही हा असा
मठ्ठ आणि ढ कसा असू शकतो?" सुमेधची
आई हताश होऊन सांगत होती.
सुमेध, वय ८ वर्षे आता ३ रीमध्ये गेला
होता. १ली पर्यंत तो बऱ्यापैकी अभ्यास करायचा. अभ्यासात गती नसली तरी व्यवस्थित
होते. मागील दोन वर्षात मात्र त्याची प्रगती असमाधानकारक होती. तो अभ्यास करत नसे, केला तर त्याला ते समजत नसे. लक्षात राहत नसे. लिहिताना, वाचताना त्याला बऱ्याच समस्या येत असत. शिक्षकही आता त्याला सतत करत
असलेल्या चुकांमुळे रागवत असत. पेरेंट्स मिटींग मध्ये त्यांनी हे पालकांच्या
लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला होता. त्यांच्या एका ओळखीच्या शिक्षकांच्या
सांगण्यावरून ते त्याला माझ्याकडे घेऊन आले होते.
अशा अनेक सुमेधला घेऊन त्याचे पालक माझ्याकडे येतात. आठवड्यातून किमान दोन तरी रुग्ण अभ्यासातील व शैक्षणिक समस्यांसाठी माझ्याकडे येतात. बऱ्याच वेळी अशा मुलांवर ‘ढ’ म्हणून शिक्का मारला जातो. शिक्षक, वर्गातील बाकी मुले, काही वेळा त्याचे पालकदेखील मठ्ठ म्हणतात. अशामुळे त्याचा अभ्यासाप्रमाणेच इतर गोष्टींवरही परिणाम दिसून यायला लागतो.
खरं तर अभ्यासामध्ये समस्या येण्याची अनेक
कारणे असू शकतात. यातील काही कारणे कुटुंबाशी निगडीत, काही कारणे शाळेशी निगडीत तर काही कारणे ही त्या मुलाच्या शारिरीक
आरोग्याशी किंवा त्याच्या मानसिक आरोग्याशी असू शकतात. पालकांची मुलांच्या बाबतीत
अनास्था, घरातील हिंसाचाराची समस्या, पालकांतील भांडणे, घटस्फोट, वडिलांचे दारू पिणे, घरचे लोक
अशिक्षित असणे, घरची आर्थिक परिस्थिती या कुटुंबाशी संबंधित गोष्टींचा समावेश असू शकतो.
विद्यार्थ्यांची जास्त संख्या, निकृष्ट
प्रशिक्षण मिळालेले शिक्षक अशा शाळेसंबधित समस्या असू शकतात. बालदमा, बालमधुमेह, कुपोषण, सतत आजारी पडणे, अशा
शारीरिक आरोग्याच्या तक्रारी तर गतिमंदपणा, बौद्धिक अपंगत्व (मतिमंदपणा), अनावधान व अतिचंचलतेचा आजार, विशिष्ट
शैक्षणिक अक्षमता, वर्तणूकीच्या समस्या, नैराश्येचा किंवा इतर मानसिक आजार, अंमली पदार्थाचे सेवन किंवा इतर व्यसनांची सुरूवात ही मानसिक
आरोग्याशी संबंधित कारणे असू शकतात.
या सर्व गोष्टींचा विचार होऊन मुलांना
अभ्यासात का समस्या येतात हे पाहायला हवे. यासाठी मनोविकार तज्ञांची, मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला हवी. डोळ्यांच्या डॉक्टरांकडून
डोळ्यांची तपासणी, कान नाक घशाच्या डॉक्टरांकडून कानाची तशीच
बोलायची समस्या येत असेल तर तोंडाची तपासणी करून घ्यायला हवी. मानसोपचारतज्ञाकडे
जाण्यापूर्वी त्याची वाढ व्यवस्थित झाली होती का? त्याच्या वाढीचे टप्पे, त्याला
अभ्यासात नेमक्या काय समस्या येतात? वागण्यात
काय समस्या येतात? याची पालकांनी नोंद करून घ्यायला हवी.
यासंबंधीत शिक्षकांचे काय मत आहे किंवा त्यांना काय दिसून येते हे विचारायला हवे
किंवा तसे पत्र त्यांच्याकडून घ्यायला हवे. दोन्हीही पालकांनी त्या मुलासोबत
मनोविकारतज्ञाकडे जायला हवे. योग्य तपासण्या होऊन योग्य निदान झाल्यास या
समस्येतून मार्ग काढणे सोपे जाऊ शकते. अन्यथा मुलासोबतचृ पालकांना याचा मानसिक
त्रास सहन करावा लागू शकतो.
विविध मानसिक कारणांचा एक एक करून उहापोह
आपण या पुढील लेखांमध्ये करून घेऊयात.
MBBS, DPM, MD(AM)
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124
#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems
Comments