नावात काय आहे

 

             नावात काय आहे?

डॉ अतुल ढगे, माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी



 

    "नाही सर मी दारू नाही पित. मी फक्त विस्की पितो." रमेश सांगत होता.

    रमेश 28 वर्षाचा होता. पूर्वी कधीतरी दारू घेणाऱ्या रमेशचे दारूचे प्रमाण आठवड्यातून ३-४ वेळा झाले होते. त्यामध्ये त्याचे कामाकडे, कुटुंबाकडे, घराकडे मुलीकडचे लक्ष कमी होतेय असे वाटल्यामुळे तिची पत्नी तिला बळेच घेऊन आली होती. तेव्हा रमेश सांगत होता, "नाही सर, मी दारू पित नाही. मी फक्त विस्की पितो."

    रमेश सारखे अनेक रुग्ण किंवा व्यक्ती मी पाहतो, ज्या आपल्या दारु पिण्याचं समर्थन करण्यासाठी किंवा काहीवेळा गैरसमजुतीतून (?) असे सांगत असतात. ताडी माडी पिणारे ही काहीवेळा मी पाहिले आहेत जे म्हणतात की मी ताडी पितो, दारू  नाही. देशी दारू म्हणजेच दारू असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा किंवा भासवायचा असावा. जेव्हा दारू पिण्याचे व्यक्ती अशा प्रकारे समर्थन करतो त्याला डिफेन्स मेकॅनिजम असे म्हणतात. त्यात सर्वात महत्त्वाची डिनायल, रॅशनलायजेशन आणि प्रोजेक्शन या तीन डिफेन्स मेकॅनिजम   व्यसनाधीन  व्यक्ती वापरतात.

    डिनायल (नकार) म्हणजे वास्तविक माहिती किंवा वास्तव न स्वीकारणे. व्यसनाधिनतेचा आजार असलेली व्यक्ती मनात येणारे सत्य विचार टाळून आपण खरे आहोत या अविर्भावात राहते. त्यामुळे त्यांना त्याच्या भावनिक परिणामाला सामारे जावे लागत नाही. सत्य परिस्थितीच्या विचारामुळे येणाऱ्या दुख:द भावना त्यामुळे टाळता येतात. त्यांच्या  आजूबाजूच्या नातेवाईकांना जे स्पष्ट वाटू शकते. उदा व्यसनामुळे होणारे परिणाम त्या व्यक्तीद्वारे टाळले जाते दुर्लक्ष केले जाते. यामध्ये व्यक्ती आपण दारू पितोय हे नाकारतो किंवा दारू पिल्यामुळे आपले काही नुकसान होत नाही असे सांगतो. मी कुठे कुणाला मारतो, गटारात पडतो किंवा माझे सगळे काम करून रात्री पितो, तर काय हरकत आहे.  किंवा मजा म्हणून रोज एक पेग तरी घ्यायला काय हरकत आहे?

   तर्कशुध्दीकरण : व्यसन करणाऱ्या व्यक्तींनी वास्तविक आणि खऱ्या कारणांऐवजी व्यसन करण्यासाठी कारणे सांगणे, दाखवणे म्हणजे तर्कशुध्दीकरण होय. अपराधीपणाच्या  भावनांपासून, टिकेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि स्वाभिमान राखण्यासाठी हे तर्कशुध्दीकरण वापरले जाते.  स्वतःच्या संकल्पनातील तथ्यांचा वापर करून स्वतःच्या आक्षेपार्ह वर्तणूकीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे व्यसन सुरू ठेवण्याच्या निवडीबद्दल त्यांना सोयीस्कर वाटते किंवा काहीजण तर दारू पिणे आरोग्यासाठी कसे चांगले आहे याचेही दाखले देतात. ते मान्य करतात की ही एक समस्या आहे परंतु कामाचा ताण, दु:ख, बालपणातील अनुभव, एखादे संकट किंवा इतर समस्या अशा गोष्टींना दोष देऊन ते तर्कसंगत बनवतात. त्यातुन ते  मी हे करत असलो तरी मी चुकिचा नाही असे दाखवतात. 

   प्रोजेक्शन (प्रक्षेपण) - एखाद्या समस्येसाठी (उदा व्यसनांसाठी) स्वतः व्यतिरिक्त इतर कोणावर तरी दोष ठेवणे म्हणजे प्रोजेक्शन. स्वतःविषयीच्या भावना, विचार, इच्छा ज्या व्यक्ती स्वतःबद्दल स्वीकारू शकत नाही ते त्या इतरांवर ढकलतात. व्यसनाच्या बाबतीत व्यसनासाठी दोष बदलण्यासाठी मार्ग म्हणून ते सहसा नकारात्मक पद्धतीने नकळत पणे वापरले जाते.

    येथे हे समजून घेणे गरजेचे आहे कि बऱ्याच वेळी या व्यक्ती या गोष्टी अनकोनशीयस लेवल वर करत असतो आणि त्याला स्वतःला याची जाणीव नसणे. व्यसनमुक्तीसाठी कौन्सेलिंग करताना या गोष्टी त्याच्या निदर्शनास आणुन दिल्यास ते व्यसन सोडण्याची शक्यता वाढते. शेक्सपिअर ने आज नाटक लिहिले असते तर त्यातली ज्युलिअट अशा रोमिओ ला म्हणाली असती. "नावात काय आहे , तू दारू म्हण, व्हिस्की म्हण, देशी म्हण इंग्लिश म्हण. सोन्या ती नशाच आहे आणि आपला संसार उध्वस्त करणार आहे.


डॉ अतुल ढगे
MBBS, DPM, MD(AM) 
मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ
माईंडकेअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ
9503421124 

#mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare, #letstalkaboutsex, #sexualproblems

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness